घरी पाळलेल्या कुत्र्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाचा चावा घेतल्याने मालकाला कुत्र्याची रवानगी गावच्या ठिकाणी करावी लागलीच, पण पोलिसांकडे त्याबद्दल दंड भरून जखमीवरील औषधोपचारासाठीचा आर्थिक भारही सोसावा लागला.
ठाण्यातील नौपाडा शिवाजीनगर परिसरातील विश्वेश्वर जोगळेकर यांना मंगळवारी सायंकाळी फेरफटका मारताना त्यांच्या पायाला पाळीव कुत्रा चावला. त्यामुळे जखमेतून रक्तस्राव होऊ लागला. भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे आधीच जेरीस आल्याने पाळीव कुत्र्यांचाही हल्ला होत असल्याने जोगळेकर यांना संताप अनावर झाला.
त्यामुळे त्यांनी उपचारांसाठी रुग्णालयात न जाता थेट पोलीस ठाणे गाठले आणि मालकाविरुद्ध कारवाईसाठी आग्रह धरला. त्यांची अवस्था पाहून पोलिसही अचंबित झाले आणि त्यांना प्रथम उपचार करून घेण्याचा सल्ला दिला. जखमी अवस्थेत जोगळेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला बोलावून जोगळेकर यांना नुकसानभरपाई देण्यास सांगितले. कुत्र्याच्या मालकाने ‘चावऱ्या’ कुत्र्याला ठाण्यातील घराऐवजी गावी पाठवण्याची हमी पोलिसांना दिली आणि दंड भरून आपली सुटका करून घेतली.

Story img Loader