ठाणे : ठाणे महापालिकेच्या तत्त्कालीन साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करून चाकूने त्यांची बोटे कापली होती. या हल्ला प्रकरणाची ठाणे न्यायालयात ३ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणात २१ साक्षीदार सरकातर्फे तपासण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पिता पिंपळे या साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. ॲागस्ट २०२१ मध्ये त्या पथकासह घोडबंदर येथील कासारवडवली भागात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास गेल्या होत्या. त्याचवेळी एका फेरीवाल्याने कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात पिंपळे आणि सोमनाथ या दोघांची बोटे कापली होती. हा हल्ला इतका गंभीर होता की, पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती. या घटनेनंतर फेरीवाल्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. साहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. याप्रकरणी ॲड. शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खटल्यात सरकारी वकिलांतर्फे अंतिम युक्तीवाद सुरु आहेत. या प्रकरणात २१ साक्षीदार तपासण्यात आले असून गुन्ह्यातील विविध पद्धतीचा पुरावा न्यायालयात मांडण्यात आला आहे. ३ मार्चला या प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे न्यायालयात होणार आहे.