अंबरनाथः अंबरनाथमध्ये एक हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा ठळक पुरावा असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या धर्तीवर शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी १०७ कोटींच्या कामाचे कार्यादेश कंपनीला देण्यात आले आहेत. सुशोभीकरण करत असताना मंदिराच्या मूळ संरचनेला कुठेही धक्का न लावता नव्याने अनेक वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे प्राचीन शिवमंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
अंबरनाथ शहरात सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या मंदिराला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी जागतिक दर्जाच्या कला महोत्सवाची सुरूवात करण्यात आली होती. सोबतच अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने या प्राचीन मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु हे शिवमंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असल्याने येथे कामे करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या प्रस्तावात मंदिरापासून १०० मीटर अंतरामधील दुरुस्ती आणि नुतनीकरणाची कामे तसेच १०० मीटर अंतराबाहेरील बांधकाम स्वरुपाची कामे अशा दोन भागामध्ये विभाजन करुन मंजुरीचा प्रस्ताव पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे सादर केला होता.
काही महिन्यांपूर्वी मंदिर दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामांसह बांधकाम स्वरुपातील कामांना पुरातत्व विभागाची मंजुरी दिली. सोबतच शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे अंबरनाथ पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा.ली. या कंपनीला १०७ कोटींच्या विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
असे होणार सुशोभीकरण
प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभिकरणाचे संपूर्ण काम काळया पाषाणात केले जाणार आहे. यात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र,अँम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत या कामांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया
अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थापत्य कलेचे संवर्धन करून तिची कीर्ती जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागणार असून यामुळे अंबरनाथ शहराला आणि शिव मंदिराला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे. – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा