एकाच दुचाकीवर चौघे जण बसून सुरू असलेला स्टंट चौघांना महागात पडला आहे. रस्त्यात फटाक्यांची माळ लावलेली असताना अचानक दुचाकीवरून चौघे आले आणि गाडीचा वेग आटोक्यात न आल्याने थेट या माळेवरच जाऊन पडले. त्यानंतर झालेली या चौघांची पळापळ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात ही घटना घडली असून या घटनेची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होते आहे.
हेही वाचा >>>ठाणे शहरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ
अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी परिसरात बुधवारी भाऊबीजेनिमित्त नागरिक रस्त्यावर येऊन फटाके फोडत होते. एका नागरिकाने रस्त्यात फटाक्यांची माळ लावली होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एका दुचाकीवरून चार तरुण बसून भरधाव वेगात पुढे येत होते. फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक काही लागले नाहीत. त्यामुळे हे तरुण थेट या माळेवरच येऊन पडले. त्यानंतर गाडी तिथेच टाकून या चौघांनी बाजूला पळ काढला. पुढे माळ फुटून झाल्यावर जाऊन आपली गाडी उचलली. या तरुणांच्या फजितीची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच पसरली आहे.