कल्याण- कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील परिसरात बुधवारी रात्री चारजणांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील १८ हजार रूपयांची रक्कम लुटून पोबारा केला. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाजवळ पादचारी, एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.संतोष केसरी (२७) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो एका हाॅटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो. तो मूळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. संतोष बुधवारी रात्री १० वाजता कल्याण रेल्वे स्थानक भागात गावी जाण्यासाठी आला होता. गाडीला वेळ असल्याने तो कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात फिरत होता. त्याच्या जवळ पगारातून मिळालेली १८ हजार रूपयांची रक्कम होती. एसटी बस आगाराखालील स्कायवाॅक खालून जात असताना एक भुरट्या चोराने संतोषला जवळ बोलावून घेतले.
त्याला त्याने कुठे चालला आहेस, अशी दमदाटीने विचारणा केली. त्या भागात इतर पादचारी नव्हते. संतोष एकटाच असताना त्याला आणखी तीन जणांनी घेरले. त्याला जबरदस्तीने पकडून अंधारात नेले. तेथे चारही जणांनी संतोषला दमदाटी करून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जबरदस्तीने त्याच्या खिशातील १८ हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. यानंतर त्यांनी त्याला जमिनीवर ढकलून पळ काढला. संतोषने चोर म्हणून ओरडा केला तोपर्यंत चौघे पळून गेले. गेल्या आठवड्यात कल्याण एसटी आगाराबाहेर मुरबाड येथील एक महिलेकडील ऐवज लुटण्यात आला होता. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री वाजल्यानंंतर प्रवाशांकडील ऐवज लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या लुटीच्या तक्रारी दाखल होत असतानाही पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.