डोंबिवली – डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंदिर संस्थानतर्फे शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. रविवारी शताब्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला ढोल-ताशा वादनाने महोत्सवाला प्रारंभ झाला. सोमवारी पहाटे गणपतीवर अभिषेक करुन श्री गणेश यागाने वर्षभराच्या कार्यक्रमांचा श्री गणेशा करण्यात आला.
रविवारी संध्याकाळी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात सात ढोल ताशा पथकांचे ५०० कार्यकर्ते उपस्थित होते. एका ताला सुरात, लयीत ढोल ताशा पथकांनी तीन तास विविध प्रकारातील ढोल, ताशा, संबळ वादन करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने डोंबिवलीतील नागरिक अधिक संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, शताब्दी महोत्सव संयोजन समितीचे प्रमुख वैद्य विनय वेलणकर, मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी ढोल, ताशा पथकांमध्ये सहभागी होते. परीक्षा संपून सुट्टीचे दिवस असल्याने मुले, मुली उत्साहाने या वादनात आकर्षक पेहरावात सहभागी झाले होते. ढोल, ताशांचा विविध ताल, सूर, लयीतील गजर, ध्वज पथकातील कलानृत्यकांच्या लयबद्ध हालचाली, ध्वजाचा चढाव उतार चित्तवेधक होता. अडीच तास सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचा परिसर दणाणून गेला होता.
हेही वाचा – बनावट पर्यटन कंपनीकडून डोंबिवली, कल्याणमधील महिलांची फसवणूक
सोमवारी सकाळी अध्यक्षा अलका मुतालिक यांच्या हस्ते श्री गणपतीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री गणेश यागाला प्रारंभ झाला. पंढरपूर क्षेत्राचे कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सव उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी श्री गणेश मंदिरावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे.