देशातील घोटाळ्यांची वाढती संख्या, त्याविषयी प्रसार माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या चर्चा, राजकारण आदी गोष्टींवर तरुणाईचे बारीक लक्ष आहे आणि त्याविषयी काही मतेही आहेत. वारंवार समोर येणाऱ्या घोटाळ्यांनी तरुणाई अस्वस्थ असून त्याचे प्रतिबिंब विविध माध्यमांतून प्रकट होत असते. स्वराज्य मंच संस्थेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतही या मतांचे प्रतिबिंब उमटले. घोटाळामुक्त देश हवा, असे परखड मत या वेळी काही तरुणांनी व्यक्त केले.
या संस्थेच्या वतीने कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन येथील पेंढरकर सभागृहात करण्यात आले होते. ५ ते १४ व १४ ते ३० अशा दोन वयोगटांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये एकूण ७७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या गटांसाठी बालपणाची हरवलेली श्रीमंती, पावसाचा लहरीपणा, घोटाळ्यांच्या देशात, पंढरीच्या वारीतील सामाजिक भान, ‘सोशल मीडिया : शाप की वरदान’ आदी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत ‘घोटाळ्यांच्या देशात’ या विषयावर अनेक तरुणांनी आपली परखड मते नोंदवली. सोशल मीडियाचा वापर आणि त्यावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत अनेक तरुणांनी या साधनांचा वापर केला तर सोशल मीडिया वरदानही ठरू शकते, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले. या स्पर्धेत ५ ते १४ वयोगटांत प्रथम क्रमांक सुवर्णा कुलकर्णी, द्वितीय पल्लवी गुडुगुडकर, तृतीय जया येखे उत्तेजनार्थ शेजल म्हात्रे आणि नीना सोमवंशी यांनी पटकावला तर १४ ते ३० वयोगटांत प्रथम शारदा पोलेकर, द्वितीय तेजस राजपूत, तृतीय रवीना गायकर, उत्तेजनार्थ हर्षदा सूर्यवंशी व मानसी सय्यद यांनी पटकाविल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष साईप्रसाद सोन्नर यांनी दिली.

Story img Loader