ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांची झालेली प्रभाग रचना पुन्हा बदलली, कोणाकरिता बदलली, त्यावेळेला नगरविकास मंत्री कोण होते ? त्यांनी स्वतःच्या खात्याचा घेतलेला निर्णय स्वतःच बदलला याचा अर्थच हा आहे की आताचे सरकार हे भाजपाच्या हातातील कळसूत्री बाहुली बनली आहे, अशी टीका गुहागर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सरकारवर केला.
दिवा येथे आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सरकार स्थापन झाल्यानंतर घेतलेले सर्वच्या सर्व निर्णय हे भाजपला अपेक्षित असलेले निर्णय घेण्यात आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेण्यात आले होते, त्यावेळी मंत्री मंडळामध्ये आताचे नऊ मंत्री होते. तरीही ते सर्व निर्णय बदलून घेण्यात आलेले निर्णय हे भाजपच्या हिताचे व भाजप सांगेल, त्याच प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत. यावरूनच बंडखोरांनी स्वाभिमान गहाण ठेवल्याची टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितला तर स्थानीक पक्षासोबत हात मिळवणी करायची आणि सत्ता मिळवायची व सत्ता मिळाल्यानंतर त्याच स्थानिक पक्षाला संपवायचे हे भाजपचे धोरण असून त्याचपद्धतीने शिवसेनेला संपविण्याचा भाजप प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून कल्याण ग्रामीण मतदार संघातून तब्बल पंचेचाळीस हजार मताधिक्याने २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडून दिले व त्याची सुरवात दिवा विभागातून झाली होती, असे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. या शहरातील नगरसेवक जरी सोडून गेले असले तरी शिवसैनिक भक्कम आहे. दिवा विभागामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची कमी नाही, हे या तुडूंब भरलेल्या सभागृहावरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. कितीही धमक्या दिल्या तरी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिवा शहरामध्ये विशेषकरून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून ते शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असे सांगितले. पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत पसरलेला कोकण हा शिवसेनेचाच आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजप कामगार आघाडी सलंग्न चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव विकास इंगळे यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी महिला संपर्क संघटक मृणाल यज्ञेश्वर, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, महिला विधानसभा संघटक कविता गावंड, महानगर संघटक वैशाली दरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.