कळवा येथील भास्कर नगर भागात गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसात अभी मौर्या (४) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह कळवा येथील मफतलाल कंपनी जवळ आढळून आला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.ठाणे जिल्ह्यात गुरूवारी मुसळधार पाऊस पडला होता. कळवा भागात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे रुप आले होते.

भास्कर नगर भाग हा डोंगराजवळ असल्याने या भागात पाण्याचा प्रवाह शिरला होता. या पाण्याच्या प्रवाहात अभी मौर्या हा वाहून गेला होता. रात्री उशीरापर्यंत पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल त्याचा शोध घेत होते. परंतु त्याचा शोध लागला नाही. शुक्रवारी पहाटे पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे साचलेले पाणी ओसरले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाला अभीचा मृतदेह मफतलाल कंपनी येथे आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Story img Loader