मी ट्रेलर म्हणून काम करतो तर, मुख्यमंत्री आल्यावर पिक्चर सुरू होतो, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. पोहरादेवी ठिकाणाचा विकास करून जागतिक दर्जाचे स्थळ करण्यासाठी आम्ही १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. पण, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने एकही पैसा दिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा >>>‘मुंब्रा रेतीबंदर खाडी किनारी भरणी’; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी ठाण्यातील हायलँड मैदानात रविवार आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बंजारा भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. बंजारा समाजाची जी मागणी आहे, ती सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्रीय स्तरावर असलेले प्रश्नही सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. आम्ही बंजारा समाजासोबत असून यापुढेही या समाजच्यासोबत असू, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा >>>ठाण्यात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार
आता टॅटू काढायची फॅशन आली आहे. पण, त्याचे जनक बंजारा समाज आहे. बंजारा समाजाकडे वनौषधींचा ठेवा आहे. या समाजाने संस्कृती, कला, नृत्य आणि गायन यामध्ये आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे, असेही ते म्हणाले. बंजारा समाज देशभर भ्रमंती करायचा आणि हा समाज ज्या मार्गावरून गेला आहे. ते सर्व राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. हा समाज भ्रमंतीदरम्यान ज्याठिकाणी थांबला, त्याठिकाणी त्यांनी विहिरी आणि तलावांची निर्मिती केली. इंग्रजांच्या लढ्यातही हा समाज अग्रेसर होता. त्याला चिरडण्याचा प्रयत्न झाला पण, तो चिरडला गेला नाही.
पोहरादेवी ठिकाणाचा विकास करून जागतिक दर्जाचे स्थळ करण्याची मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली होती. ही मागणी मान्य करत आम्ही १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. पण, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने एकही पैसा दिला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आता आमचे सरकार आल्यानंतर आम्ही निधी देण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आहेत आणि अर्थमंत्री मी आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही, असेही ते म्हणाले.