सॅकॉन आणि राज्य खारफुटी कक्षाच्या संशोधनातील नोंद; पांढऱ्या रंगांची फुले आणि सफरचंदाएवढी फळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहा वर्षांपूर्वी ठाणे खाडीकिनाऱ्यावरून गायब झालेल्या ‘अ‍ॅप्पल खारफुटी’ अर्थात ‘सोनेरेशिया अ‍ॅपेटाला’ या खारफुटी प्रजातीला पुन्हा नव्याने बहर येत असल्याचे पर्यावरणप्रेमींना आनंद देणारे चित्र दिसू लागले आहे. राज्य खारफुटी कक्षाच्या मार्गदर्शनाखाली सॅकॉन आणि बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. ठाणे, भांडुप, वसई आणि डोंबिवली परिसरात या प्रजातीच्या खारफुटीला नव्याने बहर आल्यामुळे तुरळक झालेल्या या खारफुटीच्या संख्येत वाढ होत असल्याचे राज्य खारफुटी कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी बांधकामे, कचऱ्याचा भराव आणि सांडपाण्यामुळे खाडीकिनारा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे सोनेरेशिया ही आधीच खूप कमी प्रमाणात आढळणारी खारफुटीची प्रजात गेल्या दहा वर्षांत दुर्मीळ झाली होती. मात्र, या संदर्भात नव्याने झालेल्या निरीक्षणामध्ये या वनस्पतीची झाडे बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र असून हे प्रमाण २ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा खारफुटी कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ‘ठाण्याच्या तुलनेत भांडुपकडील खाडीकिनाऱ्यावर सोनेरेशिया खारफुटीचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. काही ठिकाणी हे प्रमाण कमी असल्यामुळे हे प्रमाण नेमके किती वाढले ही सांगणे कठीण आहे,’ असे बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक गोल्डिन कॉड्रॉस यांनी सांगितले.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागांतील खारफुटींमध्ये या झाडांचे प्रमाण लक्ष वेधून घेत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या भागांमध्ये प्रामुख्याने राखाडी खारफुटी (ग्रे मँग्रोव्ह)चे प्रमाण मोठे असून ही खारफुटी इतर खारफुटींच्या वाढीस मज्जाव करीत असते. राखाडी खारफुटीवरील वाढत्या अतिक्रमणामुळे काही ठिकाणी सोनेरेशिया वाढल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

सोनेरेशिया खारफुटीविषयी

कमी प्रदूषित पाण्यामध्ये वाढणाऱ्या सोनेरेशिया खारफुटीवर यापूर्वी झालेल्या संशोधनामध्ये या खारफुटीमध्ये औषधी गुणधर्म आढळून आले आहेत. संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंधक औषध म्हणून ही खारफुटी गुणकारी आहे. खाडीकिनारी असलेल्या पारंपरिक वस्त्यांमध्ये या खारफुटीची फळे खाल्ली जातात किंवा लोणच्यामध्येही त्यांचा वापर केला जातो.

ठाण्याच्या खाडीकिनाऱ्यावर ग्रे मँग्रोव्हप्रमाणे, सोनेरेशिया मँग्रोव्ह, रेड मँग्रोव्ह आणि रोझो फोरा या प्रमुख प्रजातीच्या खारफुटी आढळतात. ठाण्यामध्ये या प्रजातींचे प्रमाण कमी-जास्त होत असले तरी शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे जतन होण्याची गरज आहे. ग्रे खारफुटी मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने इतर खारफुटीच्या झाडांवर त्यांचे अतिक्रमण होत असते. त्यामुळे सोनेरेशिया, रेड मँग्रोव्ह आणि रोझो फोरा अत्यंत तुरळक प्रमाणात ठाणे खाडीकिनाऱ्यावर आढळतात.  – अविनाश भगत, पर्यावरण अभ्यासक

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The different types of mangroves