उल्हासनगरः उल्हासनगर आणि कल्याण शहरांना जोडणारा तसेच कल्याण अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहाड रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरण केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून यासाठीची निविदा जाहीर करण्यात आली आहे. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल दररोज कोंडीत सापडतो आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला चार पदरी केले जाणार आहे. येथील कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे विस्तारीकरण महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही वर्षात कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शहाड उड्डाणपुलावरील कोंडी वाढली आहे. सातत्याने उड्डाणपुलाला खड्डे पडत असून त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी वाढते. दोन पदरी असलेल्या या उड्डाणपुलाला काही दिवसांपूर्वी थेट भगदाड पडले होते. त्यामुळे येथून वाहतुकीचा वेग मंदावतो. त्याचा फटका येथील स्थानिक नागरिक, नगर जिल्ह्यातून येणारे भाजी आणि दूध विक्रेते यांच्या वाहनांना बसतो. या मार्गावर असलेल्या अनेक शाळांमधल्या विद्यार्थ्यांनाही या उड्डाणपुलाच्या वाहतूक कोंडीचा फटका बसतो आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची मागणी एमएमआरडीएच्या बैठकीत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने आता या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी निविदा जाहीर केली आहे. लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

हेही वाचा – कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या व्यावसायिक भागीदाराला आठ महिन्यांनंतर जामीन

हेही वाचा – मोदी यांच्या सभेमुळे प्रवाशांचे हाल; टीएमटीच्या बसगाड्या सभेसाठी वळविल्या, सॅटील पुलावर प्रवाशांच्या रांगा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर आहे. तर उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रुंदी ३६ मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षांत वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. विस्तारीकरणानंतर आता शहाड उड्डाणपुल २+२ असा चार पदरी होईल.