ठाणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या माजिवडा आणि कापूरबावडी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांनी येथील वाहतूक वर्तुळाकार पद्धतीने सुरू केली होती. त्यासाठी माजिवाडा चौकात बसविण्यात आलेल्या दुभाजकामुळे कोंडीत भर पडल्याने ते हटविण्याची नामुष्की पालिका आणि पोलिसांवर आली आहे. गुरुवारी येथील दुभाजक हटवून मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांना माजिवाडा चौकातून पुढे जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि ठाणे पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी दुभाजक बसविले आहेत. गोखले रोड, नितीन कंपनी, पाचपाखाडी, माजिवडा भागात हे दुभाजक बसविण्यात आले आहेत. या दुभाजकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडू लागल्या होत्या. यातनूच गोखले रोड येथील व्यापाऱ्यांनी दुभाजक हटविण्याची मागणी केली होती. यानंतर येथील काही परिसरातील दुभाजक पालिकेने काढले. पाचपाखाडी भागात बसविण्यात आलेल्या दुभाजकाविषयी स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर येथील दुभाजक काढण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली होती. त्यापाठोपाठ आता माजिवाडा चौकातील दुभाजक पालिकेने हटविले आहेत.
हेही वाचा – ठाणे महापालिकेची धुळीवर नियंत्रण यंत्रणा बंदावस्थेत
पूर्व द्रुतगती महामार्गावरून माजिवडा चौकातून थेट मुंबई नाशिक महामार्ग, माजिवडा गाव येथे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा रस्ता दुभाजक बसवून बंद करण्यात आला होता. त्यामुळे महामार्ग, लोढा गृहसंकुल, माजिवडा गाव परिसरात वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना माजिवडा चौक, कापूरबावडी येथे वळण घेऊन वाहतूक करावी लागत होती. कापूरबावडी चौकात भिवंडी, घोडबंदर आणि कोलशेतच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भार अधिक असतो. त्यात माजिवडा गाव आणि महामार्गाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भारही कापूरबावडी चौकात वाढल्याने वाहतूक कोंडी वाढू लागली होती. त्यामुळे माजिवाडा चौकातून पुढे जाणारा रस्ता पुन्हा खुला करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला होता. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर येथील दुभाजक गुरुवारी हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
हेही वाचा – भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दोन दिवस भिवंडी, कल्याण लोकसभेचा दौरा
कापूरबावडी चौकाजवळ मेट्रो मार्गिकेच्या खांबाची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील मार्गिका अरुंद झाली आहे. दररोज रात्रीच्या वेळेत कापूरबावडी चौकात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांनी आता माजिवडा चौकातील उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या स्वरुपात बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू केला आहे.