ठाणे : भिवंडी शहरामध्ये पुढील वर्षातील वाढते नागरिकरण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन विकास प्रारूप आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यामध्ये शहरातील विविध भुखंडावर आरक्षणे टाकण्यात आली असून उद्यान, मैदान, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. हा आराखडा मंजूर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने प्रारुप आराखडा प्रसिद्ध करत नागरिकांकडून ३० दिवसांत हरकती व सूचना मागविल्या आहेत.
भिवंडी हे उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी मोठ्याप्रमाणात गोदामे आणि यंत्रमाग कारखाने आहेत. व्यापारीदृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या शहरात लोकवस्तीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. परंतु शहरात पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांची वानवा आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २६.२६ चौ.मी. इतके आहे. यापूर्वी भिवंडी महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा २००१ आणि २००३ मध्ये तयार करण्यात आला होता. आरखड्यात पुढील २० वर्षांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याची फारशी अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. त्यापाठोपाठ आता भिवंडी शहरामध्ये पुढील वर्षातील वाढते नागरिकरण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहराचे नवे नियोजन आखले आहे. भविष्यात शहरात कोणत्या नागरी सुविधा उभारणे गरजेचे आहे आणि त्या कोणत्या ठिकाणी असाव्यात याचे नियोजन आराखड्यात करण्यात आले. राज्य शासनाने हा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा – ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
नवीन प्रारूप विकास आराखडा तयार करताना प्रशासनाने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित जीआयएस प्रणालीनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. मूळ नकाशा, भूखंड वापर नकाशा आणि त्याआधारे प्रस्तावित भूखंड वापर नकाशा दिलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळेत तयार करण्यात आला. शासकीय व निमशासकीय विभागाची मागणी विचारात घेऊन तसेच विकास योजनेबाबत नागरिकांनी अर्जाद्वारे केलेल्या अपेक्षांचा विचार करून प्रस्तावित भूखंड वापर आराखडा तयार करण्यात आला आहे. भूखंड वापर नकाशा आराखड्यामध्ये काही त्रुटी असल्याचे अद्यापपर्यंत निदर्शनास आले नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच नगररचना संचालनालयाकडील निर्देशानुसार व्यापारी संघटना, अभियंत्यांसोबत बैठका घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे होणारा विकासाचा कल या बाबींचा विचार विकास आराखड्यात करण्यात आला आहे. पुढील २० वर्षांचे म्हणजेच, २०४३ सालापर्यंतचा विचार करून हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी हा प्रारूप विकास आराखडा गुरुवारी प्रकाशित केला आहे. या आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असतील तर त्या पुढील ३० दिवसांमध्ये सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे.