डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहनावरील चालक विनोदी मनोहर लकेश्री यांच्यावर सोमवारी रात्री पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालया बाहेरील रस्त्यावर एका अनोळखी इसमाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या घटनेने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मागील काही वर्ष चालक विनोद लकेश्री यांचे नाव डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांशी जोडले गेले आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी यापूर्वी तक्रारदारांनी पालिकेत केल्या आहेत. या तक्रारींवरून दोन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्तांनी विनोद लकेश्री यांची डोंबिवलीतील ग प्रभागातून थेट टिटवाळा येथील अ प्रभागात बदली केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाने तीन वर्षापूर्वी त्यांची चौकशी केली आहे.
हेही वाचा… अंबरनाथमध्ये उलगडणार “दीक्षित डाएट” चे महत्व!
पोलिसांनी सांगितले, सोमवारी रात्री साडे आठ वाजता विनोद लकेश्री पालिकेचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर, सचीन गावडे, धर्मराज यादव पालिका कार्यालया बाहेरील भगतसिंग रस्त्यावरील खोजा जमादखानाच्या प्रवेशव्दारावर पी. पी. चेंबर्स माॅल जवळ चहा पित उभे होते. त्यावेळी चोर चोर ओरडत एक अनोळखी इसम अचानक लकेश्री यांच्या जवळ आला. त्याने इतर सहकाऱ्यांना बाजुला करत अचानक पाठीमागून लकेश्री यांच्या उजव्या हातावर धारदार चाकुने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात पळापळ झाली. हल्ल्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेला. साथीदारांनी त्याचा पाठलाग केला. पण, तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेला. लकेश्री यांना तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नंतर एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. लकेश्री यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी एका अज्ञात इसमा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.