वनस्पतींमध्ये फक्त पावसाळ्यात कंदामधून उगविणाऱ्या वनस्पतीचे एक अनोखे विश्व आहे यातील थोडे आता आपल्याला माहीत झाले आहे. नदीच्या काठावर जंगलात, सह्य़ाद्रीच्या पठारावर, हिमालयाच्या दऱ्या-खोऱ्यात अनेक प्रकारच्या कंदातून वाढणाऱ्या वनस्पती उगवतात. यांची होणारी वाढसुद्धा वेगवेगळी असते, तसेच ती वेगवेगळ्या काळातहोत असते. उदा. कासचे पठार व्हॅली ऑफ फ्लॉवर, विशिष्ट तापमान, विशिष्ट उंची आवश्यक असणारी हवेतील आद्र्रता व जमिनीत असणारा ओलावा. याप्रमाणे त्याची वाढ होत असते. आपण जे केशर वापरतो ते वनस्पतीच्या फुलांतील परागदांडे असतात. या केशरची फुले अतिशय कमी काळच टिकतात. त्याचे कंद असतात, त्यांची वाढ काश्मीरच्या काही भागातच होते, जमिनीलगतच फुले येतात. प्रत्येकातील परागदांडे गोळा करून ते सुकवून केशर बनते. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये अनेक प्रकारची अतिशय देखणी फुले ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात फुलतात. लाटालाटांप्रमाणे वेगवेगळ्या फुलांचा बहर येत-जात असतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहावयास मिळतात.
कंदामधून किंवा बीमधून उगवून अल्पकाळात आपले जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या व खूप देखणी फुले असणाऱ्या असंख्य वनस्पती सह्य़ाद्रीच्या पठारावर पाहावयास मिळतात. आपल्या हौशीसाठी आपण त्यांना नामशेष करत आहोत. महाबळेश्वरच्या वेण्या लेक परिसरात जेथे घोडय़ांवरून आपण फेरफटका मारतो, पण फक्त तेथेच वाटणाऱ्या अन्य कुठेही न उगवणाऱ्या प्रजाती वाढत होत्या, त्यांचा आपल्या हौशीपायी नाश झाला आहे. आता पुढचा धोक्यात आलेला व नामशेष होण्याची शक्यता असणारा प्रदेश म्हणजे ‘कासचे पठार’ या पठारावर फुलांच्या हंगामात अक्षरश: जत्रा भरते. त्यातील अनेक जण तेथील छोटय़ा, देखण्या दिसणाऱ्या फुलांची रोपे उपटून आपल्या घरात बागेत लावण्यासाठी उपटून आणतात. त्या वनस्पती दुसरीकडे जगणे अवघड असते आणि जगलीच तर त्यांना फुले येणे खूपच दुर्मिळ असते. ही झाडे जगणे व त्यांना फुले येणे ही शक्यता ‘पीपीएम’ (Part Per Milion) इतकी आहे आणि जर फुले आलीच तर त्यापासून फळ, बी तयार होणार नाही. कारण त्या फुलांचे परागीभवन करणारे कीटक इतर दुसऱ्या ठिकाणी नसतात. वनस्पतीची संपूर्ण परिसंस्था फक्त त्याच जागी असते. त्यांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांचा आपल्या येथे अभाव असतो. यालाच आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. जैवविविधतेचे आपल्या देशात प्रमुख बारा भाग आहेत. त्यातील चार सह्य़ाद्रीत आहे. पर्यटकांनी खरे म्हणजे अशा क्षणभंगूर वनस्पती वाढणाऱ्या भागात जाऊच नये. अभ्यासकांनी यावर चांगल्या फिल्मस तयार कराव्यात व त्या पाहून आपण हा आनंद घ्यावा जसा आपण ‘डिस्वव्हरी’ चॅनेलवर घेतो तसा. जंगलात जाणे व पठारावरील अल्पायुषी फुलांचा उत्सव पाहायला जाणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
आपण इतिहासातून काहीच शिकत नाही. भरतपूरला दरवर्षी मायग्रेटेड पक्षी (स्थलांतरित) खूप येतात. त्या पाणथळ जागेत आजुबाजूच्या गावातील लोक गुरे चरत व त्या पाणथळ जागेवर वाढणाऱ्या गवताच्या वाढीवर ते खाऊन अप्रत्यक्ष नियंत्रणच होत असे. त्या लोकांनी येऊ नये म्हणून तिथे कुंपण घालून तेथे चराई बंदी केल्यामुळे तेथे येणाऱ्या पाणपक्ष्यांची संख्या खूपच कमी झाली. कारण तेथे बेसुमार गवत वाढले व पाणपक्षांना उडण्यासाठी जो रनवे लागतो ज गवतामुळे नष्ट झाला तीच चूक आपण कासच्या पठारावर करत आहोत. इथेसुद्धा गुरांच्या चरण्यामुळे गवताची वाढ नियंत्रित होती. आता तेथे कुंपण घातल्यामुळे हळूहळू गवत जोमाने वाढेल आणि छोटय़ा छोटय़ा फुलणाऱ्या वनस्पती नष्ट होतील. प्रत्येक भागाची परिसंस्था वेगवेगळी असते. त्यांच्या वेगवेगळ्या अन्नसाखळ्या असतात. मानवी हस्तक्षेपांमुळे त्यातील एक कडी जरी तुटली तरी ती अन्नसाखळी बाधित होते व ती परिसंस्थाच नष्ट होते.
आपण नकळत अशा अनेक साखळ्या तोडत असतो. नेत्रसुखसुद्धा महत्त्वाचा उपभोग आहे. देखणे, टवटवीत, सुगंधी, मुलायम, विविधरंगी असे वनस्पतींचे वेगवेगळे भाग पाने, फुले, फळे आपला हा उपभोग पूर्ण करत असतात. आपण आपल्या घरात, गच्चीत अशा वनस्पती लावून तो उपभोग पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात आपण बहुतेक वर्षभर टिकणारी अशीच झाडे लावतो. वर्षांतून एकदाच अल्पकालीन फुले येणारी झाडे आपण लावत नाही. पण आपण आपल्या कुंडीत असे कंद हंगाम संपल्यावर काढून नीट ठेवून, कुंडी रिकामी करून त्यात हंगामी झाडे लावू शकतो किंवा कंदबदलून दुसऱ्या हंगामात येणारे कंद लावू शकतो.
पावसाळ्यात येणाऱ्या फुलांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या लिली प्रकार यात ‘ट्रंपेटलिली’, ‘अमरँथस लिली’, ‘स्पायडर लिली’, छोटी रंगीत लिली, भुईचाफा, ‘मेफ्लॉवर’ किंवा ‘फायरबॉल’, सोनटक्का इ. वनस्पती येतात. यात साधी लिली एकच फुल एका दांडय़ावर येते, तर ‘फायरबॉल’ची कळी आधी येते. मात्र, फुले फुलण्यास चार-पाच दिवस लागतात, हळूहळू पाने येतात. फुल ५-६ दिवस टिकते. त्यानंतर पाने वाढत राहातात व कंदात अन्न साठवत राहातात. कंद मोठा होतो व त्याचे हळूहळू दोन कंद तयार होतात. काही कंदांना आधी पाने येतात व मग फुले येतात, ग्लॅडीओला, निशीगंध हे यात मोडतात. सोनटक्क्य़ाची झाडे रनर मुळाच्या खोडापासून दुसरी फूट येऊन वाढतात. हिवाळ्यात डेलियाचे अनेक प्रकार उगवतात. ग्लेडिओला तर वर्षभर फुले येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा