भगवान मंडलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिकेतील बनावट रस्ते नस्ती घोटाळा उघडकीला आल्यानंतर पालिका प्रशासनाने नस्तींचा हाताने होणारा प्रवास कायमचा थांबविण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ई ऑफिस प्रणाली यासाठी विकसित केली जाणार आहे. सुरुवातीला चार विभागांच्या माध्यमातून हा पथदर्शी प्रकल्प राबवून मग त्याची तात्काळ इतर विभागांमध्ये अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, असे एक वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी रस्ते बांधकाम नस्तींचा साडे सात कोटीचा घोटाळा उघडकीला आणला आहे. त्यांनाही हाताने नस्ती एकमेकांच्या दालनात मंजुरीसाठी नेण्याच्या पध्दतीमुळे नस्ती गहाळ करणे, स्पर्धक ठेकेदाराच्या नस्तीमधील महत्वाची कागदपत्रे फाडून त्याला त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचे लक्षात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी पालिकेने ई आफिस प्रणाली गतिमानतेने राबविण्याचा संकल्प केला आहे. नस्ती गहाळ प्रकरणामुळे या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.

हेही वाचा >>> ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी; ठाणे ते ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा

या प्रकल्पासाठी परिपूर्ण आज्ञावली (साॅफ्टवेअर’ तयार केल्यानंतर तात्काळ या प्रकल्पाची अंमलबजाणी सुरू केली जाईल. नस्तींची सर्वाधिक उलाढाल ही सामान्य प्रशासन विभाग, संगणक विभाग, नगररचना आणि लेखा विभागात असते. त्यामुळे या विभागांमध्ये ई ऑफिस प्रणालीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा विचार प्रशासन करत आहेत. एक दालनातून दुसऱ्या दालनात नस्ती नेताना आतापर्यंत शिपाई, ठेकेदार या हालचाली करत होते. वर्षानुवर्ष तेच ठेकेदार आणि तेच अधिकारी त्यामुळे अधिकारी ठेकेदारांच्या हातात बिनधास्तपणे पालिकेची नस्ती देऊन कार्यभाग साधत होते.

नगरसेवक ठेकेदार

पालिकेत मागील २५ वर्षात गटार, पायवाटा, पदपथ बांधणारे बहुतांशी मजूर कामगार संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक म्हणून निवडून आले. यापूर्वी हे नगरसेवक आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून येऊन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काम करणाऱ्या मंजूर संस्थांमध्ये भागीदार म्हणून काम करत होते. नगरसेवक झाल्यानंतर परप्रांतीय मजूर संस्था नगसेवकांनी व्यवहार करुन नातेवाईकांच्या नावे करुन घेतल्या. पालिकेतील धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी, स्वच्छता, गटार, पायवाटा, पदपथ, गटार बांधणी, सफाईची कामे नगरसेवक आपल्या मजूर संस्थेच्या माध्यमातून करत आहेत.

हेही वाचा >>>ठाण्यात भाजप – शिंदेगटात राडा; भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अधिकाऱ्यांचा सहभाग

या मजूर संस्थांमध्ये बांधकाम, जल-मलनिस्सारण, लेखा अभियांत्रिकी विभागातील अधिकारीही आर्थिक भागीदारी करु लागले. त्यामुळे नगरसेवक, अधिकारी यांच्या संगनमताने मागील अनेक वर्ष गटार, पायवाटा, पदपथांच्या बनवाट नस्ती तयार करुन त्या माध्यातून कोट्यवधी रुपये पालिके्च्या तिजोरीतून लाटण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या दबावामुळे कधी कोणी हे प्रकार उघडकीला आणले नाहीत. आयुक्त दांगडे यांच्या चाणाक्ष नजरेने हा बनावट नस्ती घोटाळा उघडकीस आणला. वर्षानुवर्ष बनावट विकास कामे, त्या माध्यातून नऊ लाख नऊ हजार ९९९ रुपयांची देयके पालिकेच्या तिजोरीतून उकळण्याची कामे सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचे पित्ते या कामांमध्ये अग्रभागी आहेत. प्रत्येक टेबलची टक्केवारी वाटप केले की नस्तीचा प्रवास सुखकर होत होता. तीन वर्ष पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आणि अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याने वारेमाप कंत्राटी भरती, बनावट नस्ती तयार करण्याची कामे जोमात असल्याचे समजते.

हेही वाचा >>>महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने बिकट स्थिती

ई ऑफिस प्रणाली

या प्रणालीमुळे नस्तीचा प्रवास ऑनलाईन माध्यमातून होईल. नस्ती एका दालनातून दुसऱ्या विभागात कधी, कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर गेली आहे. त्या नस्तीची तेथील स्थिती काय आहे. हे बसल्या जागी अधिकाऱ्यांना कळणार आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर नस्ती किती दिवस प्रलंबित आहे. हे कोणीही अधिकारी कोणत्या टेबलला बसून पाहू शकणार आहे. यामुळे नस्ती गहाळ करणे, ठेकेदारांकडून नस्तींची हालचाल थांबणार आहे.
ई आफिस प्रणालीसाठी आज्ञावली, लाॅगिन पध्दत विकसित करावी लागेल. त्यानंतर ही प्रणाली गतिमानतेने काम करील. ही कामे आता प्राथमिक स्तरावर सुरू आहेत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आयुक्त डाॅ. दांगडे यांनी ई ऑफिस प्रणाली राबविण्यासाठी प्रशासन तत्पर आहे, असे आश्वासन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fake road drainage scam in kalyan dombivli municipality came to light amy