कल्याणमधील पाचव्या शतकातील संस्कृतीचा पुरावा
प्राचीन बंदर म्हणून अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून कलियान या नावाने सध्याच्या कल्याणचे उल्लेख असले तरी आता शहरात तितके प्राचीन अवशेष फारसे आढळत नाहीत. मात्र शहरातील नव्या विष्णू मंदिरात द्वारकाधीश नावाने पूजल्या जाणाऱ्या मूर्तीच्या रूपाने कल्याणमध्ये पाचव्या शतकात नांदत असलेल्या संस्कृतीची एक ठळक खूण सापडली आहे. इतिहासतज्ज्ञांनी निरीक्षण करून ही मूर्ती पाचव्या शतकातील असल्याचा निर्वाळा दिला आहे.
कल्याणच्या लेंडी तलावात १२० वर्षांपूर्वी ही विष्णू मूर्ती सापडली. शहरात पेशवेकालीन विष्णू मंदिर आहे. त्यामुळे नव्याने सापडलेली मूर्ती म्हणून याला ‘नवा विष्णू’ हे नाव पडले. शहरातील लोहाणा समाजातील रहिवाशांनी द्वारकाधीश म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अत्रे नाटय़गृहापासून हाकेच्या अंतरावर दूधनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे नवे विष्णू मंदिर आहे. पुढे नागरीकरणाच्या रेटय़ात लेंडी तलावही बुजविला गेला. त्या ठिकाणी आता सुभाष मैदान आहे.
दरम्यान कल्याणमधील पारनाका येथे राहणाऱ्या चिंतामणी फडके यांच्या घरात पिढीजात पूजेच्या साधनांमध्ये असलेला शंख प्राचीन असल्याचे आढळून आले. तो शंख पाहून परिसरात प्राचीन विष्णू मूर्ती असावी, असा अंदाज याच परिसरात राहणारे ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी वर्तविला. त्या दृष्टीने त्यांनी शोधही सुरू केला. त्यातूनच नवा विष्णू म्हणून पूजल्या जाणाऱ्या द्वारकाधीशाच्या मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले. सहा फुटी या पूर्णाकृती मूर्तीच्या एका हातात शंख, तर दुसऱ्या हातात गदा आहे. एका हात विठ्ठलासारखा कंबरेवर आहे.
कल्याणमधील ही मूर्ती पाचव्या शतकातील आहे. पनवेल तसेच घारापुरी येथे पाचव्या शतकातील अशा प्रकारच्या मूर्ती मिळाल्या आहेत. मात्र त्या खंडित स्वरूपाच्या आहेत. कल्याणमधील मूर्ती मात्र अखंड आहे. महाराष्ट्रात पूजली जाणारी ही सर्वात प्राचीन विष्णू मूर्ती आहे. पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ सदाशिव गोरक्षकर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
– डॉ. अरुणचंद्र पाठक, प्राच्यविद्या संशोधक