बदलापूर: अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तीन बिबट्यांचा वावर असून आपल्या नातेवाईकांना खबरदारीची आव्हान करणारे संदेश गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. सोबतच दोन चित्रफिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जात आहेत. मात्र या चित्रफिती नाशिक जवळच्या देवलाली परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले असून वनविभागानेही बदलापूर आणि अंबरनाथ परिसरात बिबट्याचा संचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. समाज माध्यमांवर मात्र बिबट्यांवरून खमंग चर्चा रंगते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या दोन्ही बाजूंना विस्तीर्ण जंगल आहे. अंबरनाथ पश्चिमेला जांभूळ, वसत शेलवली ते थेट बारावी धरण क्षेत्र तसेच मुरबाड या पट्ट्यात तर दुसरीकडे टाहुलीच्या डोंगरांपासून थेट माथेरानपर्यंत हे जंगल विस्तीर्ण पसरलेले आहे. या दोन्हीही जंगल भागात बिबट्यांचा वावर आहे. राहण्यासाठी पोषक वातावरण असल्याने येथे अनेकदा बिबट्यांचा संचार असतो. गेल्या काही वर्षांत या बिबट्यांनी जंगलाच्या वेशीवर राहणाऱ्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर हल्ले केले. जुन्नर वनपरिक्षेत्रातील बिबट्या अशाच प्रकारे मुरबाड मार्गे थेट बदलापूर आणि अंबरनाथच्या जंगलात काही महिने वास्तव्यास होता. त्यामुळे या भागासाठी बिबट्याचा संचार नवा नाही. मात्र बिबट्याने कधीही शहरातील मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे दिसून आले नाही. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून बदलापूर आणि अंबरनाथ परिसरात तीन बिबट्यांचा संचार असल्याचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. विशेषतः ठाणे, मुंबई आणि उपनगरातून हे संदेश अंबरनाथ बदलापूर येथील आपले नातेवाईक, मित्र यांना प्रसारित केले जात आहेत. सोबतच त्यांना खबरदारी घेण्याचे आवाहनही केले जाते आहे. मात्र अंबरनाथ बदलापूरच्या जंगल क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा बिबट्या वावरत नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – घोडबंदर मार्गावर खासगी बसगाडीचा अपघात; सहा प्रवासी जखमी

बदलापूर वनक्षेत्राचे क्षेत्रपाल विवेक नातू यांना याबाबत विचारले असता प्रसारित होणारी चित्रफीत बदलापूर किंवा अंबरनाथ भागातील नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे, नातू यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत प्रसारित होणारी माहिती अफवाच असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत दोन महिने उच्छाद घालणारं माकड जेरबंद, वनविभागाची कारवाई

चित्रफीत नाशिकची

प्रसारित होत असलेल्या चित्रफितीमध्ये वनविभागाचे कर्मचारी आपल्या शासकीय वाहनातून आडके नगर, भवानी नगर रस्ता या नावांचा उल्लेख करत नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता हे परिसर नाशिक जवळील देवलाली भागातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे . तसेच दुसऱ्या चित्रफितीत एका नागरी वस्तीतील रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचे दिसते आहे. मात्र ही चित्रफीतसुद्धा नाशिक परिसरातीलच असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.