चौथ्या पिढीकडून दस्तावेजांचे जतन; खापर पणजीने जुन्या घरातील चोरकप्प्यात ठेवलेला ऐतिहासिक पुरावा; अभ्यासकांना उपयुक्त

१८८०मध्ये मोडी लिपीत लिहिलेले चार ताम्रपट (पाठपोट) डोंबिवलीतील रहिवासी अशोक ढमाले यांच्या घरात आहेत. वडिलांच्या आजीने जुन्या घरामधील चोरकप्प्यात ठेवलेले हे ताम्रपट नवे घर बांधताना सापडले आहेत. यावरील भाषा मोडी लिपीत असल्यामुळे मजकूर काय आहे हे समजण्यास वाव नसल्याने तो तज्ज्ञाकडून समजून घ्यावा लागणार आहे.
अशोक ढमाले चौथ्या पिढीचे वंशज आहेत. ढमाले कुटुंबीय हे मूळचे सांगलीजवळील अमरापूर गावचे रहिवासी. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिक संस्थांनांमधील राजे, इंग्रज राजवटीत स्थानिक वजनदार मंडळींना सरदारकी, सावकारी दिली जात होती. स्थानिक सरदाराने नेमून दिलेल्या परिसराचा महसूल जमा करून तो सरकारी तिजोरीत भरणा करायचा. अशीच सरदारकी ढमाले कुटुंबीयांमधील कृष्णा ढमाले (खापर पणजोबा) यांना सुमारे १८८० ते १८९०च्या सुमारास मिळाली होती. अमरापूर गावापासून १२ किलोमीटर अंतरावरील विटा (सांगली) भागातील सरदार म्हणून कृष्णा ढमाले काम पाहत होते. कृष्णाजी कडक शिस्तीचे होते. सारा, कर वसुली नियमित वेळेवर झालीच पाहिजे, असा त्यांचा दरारा असायचा. सारा न भरणाऱ्यांची शेती, धान्य, मालमत्ता जप्त करण्यात ते पुढाकार घेत असत. कृष्णाजींच्या या कडक शिस्तीमुळे स्थानिक शेतकरी, रहिवासी हैराण झाले होते. जुलूम सहन न झाल्याने त्यावेळच्या एका गटाने त्यांची हत्या केली. घरात कृष्णाजी यांची पत्नी मैनाबाई व दोन लहान मुले होती. बाहेर शेतकरी, रहिवासी संतप्त झालेले. अशा परिस्थितीत करायचे काय? असा विचार मैनाबाईंनी केला. पतीप्रमाणे आपणासही स्थानिक लोक मारतील, अशी भीती मैनाबाईना वाटली. त्यांनी अमरापूर गाव सोडून भावाच्या घरी गार्डी (सांगली) येथे जाण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या समक्ष निघून गेले तर ते गावातून बाहेर पडू देणार नाहीत. म्हणून मैनाबाईने घरातील अत्यावश्यक साहित्य, पुंजी आणि त्यात घरात तांब्याच्या पाटावर काही तरी लिहिलेले आहे, म्हणून ताम्रपट एकत्र केले. या सगळ्या सामानाची गाठोडी बांधली. घरात दोन लहान मुले आणि स्वत: त्यामुळे घरातील अख्खे सामान घेऊन जाणे आजीला शक्य नव्हते.
भीतिपोटी अमरापूर गाव सोडण्याचा निर्णय आजीने घेतला. एक दिवस रात्रीच्या वेळेत गाव सामसूम झाले. तीच संधी साधून काळोख्या रात्रीत डोक्यावर, कमरेवर आणि मुलांच्याजवळ (एका मुलाचे नाव बापू) जेवढे देता येईल तेवढे सामान, ऐवजाने भरलेले हंडे काखोटीला मारून रात्रभर प्रवास करून आजीने भावाचे गाव गाठले. सरदारकी असल्याने घरात ऐवज होता. हा सगळा ऐवज पुन्हा कोणी लुटून नेला तर, अशी भीती मैनाबाईंच्या मनात होती. काही दिवस भावाच्या घरात खापर आजीने काढले. त्यानंतर गार्डी गावात आजीने स्वत:साठी घर बांधले. घरकाम सुरू असताना, मातीच्या अठरा इंचाच्या भिंतीमध्ये कोनाडे तयार करून त्यात किमती ऐवज आणि ताम्रपट लपवून ठेवण्यात आले. वर्षांनुवर्षे हे ताम्रपट भिंतीच्या चोर कोनाडय़ात होते.
कडेपूर येथील मालमत्ता घरात कोणी नाही पाहून लोकांनी लुटली. मैनाबाईंचे निधन झाल्यावर ढमाले कुटुंबीयांनी घराचे नूतनीकरण केले. त्यावेळी भिंतीत चोर कोनाडय़ात लपून ठेवलेले ताम्रपट हाती लागले. राजाराम ढमाले यांनी ते ताब्यात घेतले. खापर आजोबांच्या काळातील हा एक चांगला दस्तऐवज कसला तरी पुरावा आहे, म्हणून ढमाले यांच्या चौथ्या पिढीने हा सगळा ऐवज जतन करून ठेवला आहे, असे अशोक यांनी सांगितले. ढमाले हे जवाहीर असून, व्यवसायाच्या निमित्ताने ते पुणे येथे असतात. इतिहासाच्या अभ्यासकांना हे ताम्रपट उपयुक्त
आहेत.

पक्षांची चित्रे
आठ बाय तीन इंचाचे लाकडी पाटाच्या आकाराचे चार ताम्रपट आहेत. ताम्रपटावरची माहिती पाठपोट लिहिण्यात आली आहे. ताम्रपटावर १८९०चा उल्लेख दिसतो. याशिवाय पक्षी, गरुड यासारखी चित्रे काही ठिकाणी आहेत. हे ताम्रपट पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांना दाखवून या ताम्रपटावरील भाषेचा उलगडा करण्यात येणार आहे, असे ढमाले यांनी सांगितले.

Story img Loader