डोंबिवली- सकाळी सहा, सात वाजता घर सोडून नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबईतील आपली कार्यालये गाठण्यासाठी धडपड करत असलेला बहुतांशी नोकरदार वर्ग शुक्रवारी सकाळपासून शीळफाटा रस्त्यावरच्या कोंडीत अडकला. काटई नाक्यापासून ते मुंब्रा-महापे फाट्यापर्यंत जाण्यासाठी नोकरदार वर्गाला दोन तास लागले. कार्यालयीन वेळ सुरू होऊन एक तास उलटला तरी आपण कार्यालयात पोहचणे शक्य नसल्याने शीळफाटा कोंडीत अडकलेल्या बहुतांशी नोकरदारांनी शुक्रवारी घरी परतणे पसंत केले.

शीळफाटा येथून तुर्भे, म्हापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महापेकडे जाताना रस्त्यावर दरड कोसळली असल्याची माहिती वाहन चालकांना मिळत होती. काटई ते शीळफाटा दत्तमंदिरापर्यंत पोहचण्यासाठी बदलापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर भागातून आलेल्या चाकरमान्याला दोन तास लागत होते. महापे येथे जाण्यासाठी अशीच वाहन कोंडी असेल तर आपण संध्याकाळपर्यंत पोहचू असा विचार बहुतांशी नोकरदारांनी केला.

या वाहन कोंडीत पनवेल, नवी मुंबई, ठाणे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या बस अडकल्या. या कंपन्यांच्या कामगारांना वाहन कोंडीचा फटका बसला. सरकारी, निम सरकारी कार्यालयात थोडे उशिरा गेले तरी पावसाचे कारण सांगून जुळवून घेतले जाते. कंपन्यांमध्ये ही परिस्थिती नसल्याने अनेक कामगारांनी शीळफाटा नाका येथून माघारी फिरणे पसंत केले, अशी माहिती घरी परतलेल्या एका कर्मचाऱ्याने दिली.

शीळफाटा रस्त्यावरील सततच्या वाहन कोंडीमुळे अनेक रुग्णवाहिका चालक डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर परिसरातील रुग्णाला नवी मुंबई, ठाणे भागात घेऊन जाण्यास माघार घेत आहेत. शीळफाटा कोंडीत कितीही प्रयत्न केले तरी वाहन कोंडीतून वाहन बाहेर काढताना कसरत करावी लागते. रुग्णाला वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचविता येत नाही. कोंडीत अडकल्याने पेट्रोल खर्च वाढतो. त्यामुळे भाडे परवडत नाही. वाढीव भाडे रुग्ण नातेवाईक देत नाहीत, अशी खंत रुग्णवाहिका चालकांनी व्यक्त केली. त्यामुळे रुग्णवाहिका चालक रुग्णाला नवी मुंबई भागात घेऊन जायचे असेल तर सकाळी सहा वाजण्याच्या आत घेऊन जाणार असेल तर तयार होत असल्याचे एका रुग्ण नातेवाईकाने सांगितले.

कल्याण शीळफाटा रस्त्यावर रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरणाची काही कामे संथगतीने सुरू आहेत. जी कामे रखडली आहेत त्या कामांची माहिती घेऊन ती कामे झटपट मार्गी लागतील. प्रवाशांना शीळफाटा रस्त्यावरून विनाअडथळा प्रवास करण्याची संधी मिळेल या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून शीळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीने प्रवासी मेटाकुटीला आला आहे.

या रस्त्यावरील खड्डे, काही ठिकाणी रखडलेली कामे हेच वाहन कोंडीचे मुख्य कारण आहे. शीळफाटा रस्त्याला अनेक ठिकाणा सेवा रस्ता नाही. त्याचाही फटका मुख्य रस्त्यावरील वाहनांना बसत आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध असला की कोंडी सोडविण्यासाठी अशा रस्त्याचा वापर करता येतो, तशी सुविधा शीळफाटा रस्त्याला नसल्याने शीळफाटा रस्ता वाहन कोंडीत अडकतो. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते, अशी माहिती एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याने दिली.