ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडी तसेच राज्यातील इतर भागांत घरफोडी करणाऱ्या टोळीतील काही सदस्य हे कल्याणफाटा येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप पाटील यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापूरे, पोलीस हवालदार राजेंद्र सांबरे, अनिल पाटील, अमोल देसाई, नामदेव मुंडे, बाळु मुकणे, शिपाई सागर सुरकळ, समीर लाटे यांचे पथक तयार केले. या पथकाने सापळा रचून शफतउल्लाह, हैदर आणि शेर खान यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांचा साथिदार जमील मलिक याचेही नाव समोर आले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यातील शफतउल्लाह, हैदर आणि शेर या तिघांविरोधात भिवंडीसह नांदेड, हिंगोली येथेही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
हेही वाचा – आज रात्रीपासून मुंब्रा बायपास बंद
काही दिवसांपूर्वीच हिंगोली आणि नांदेड येथील शेतकऱ्यांच्या धान्य चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. विधानसभेतही हा मुद्दा तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित झाला होता. येथील हरभरा, सोयाबीनची पोती चोरण्यात आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींविरोधात कारवाईसाठी तसेच पुढील तपासासाठी तिघांचा ताबा हिंगोली पोलीस घेणार आहेत.