ठाणे : कर्करोग रुग्णांचा आधार असलेल्या मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयाची प्रतिकृती गणेशोत्सवाचा देखावा म्हणून डोंबिवलीतील बालाजी आंगन मंडळाने यंदा साकारली आहे. देशभरातील कर्करोग रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या रुग्णालयाला मानवंदना देण्यासाठी ही प्रतिकृती साकारल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती देखील करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांकडून विविध विषयांवर जनजागृती करणारे देखावे उभारले जातात. सार्वजनिक मंडळांतील गणेशोत्सवात अनेक नागरिक दर्शनासाठी हजेरी लावता असतात. यामुळे नागरिकांमध्ये संदेश पोहचविण्यासाठी हे देखावे उपयुक्त ठरत असतात. याच पद्धतीने नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीतील बालाजी आंगन या गृहसंकुलातील रहिवाशांनी त्यांच्या इमारतीच्या आवारात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी एक आगळा वेगळा देखावा उभारला आहे. मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालय मागील अनेक वर्षांपासून देशभरातील कर्करुग्णांचा आधार बनले आहे.

‘उध्दव, साहेबांनी एका रिक्षा चालकाला सन्मानाची पदे दिली हीच त्यांची मोठी चूक’

या रुग्णालयात अगदी कमी किमतीत कर्करोगावर उपचार केले जातात. येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे सर्व सामान्य आणि गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्वाचे आहे. अनेकांना जीवनदान देणाऱ्या या रुग्णालयाला आणि जे आर डी टाटा यांच्या विचारांना मानवंदना देण्यासाठी हा देखावा उभारण्यात आले असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच कर्करोगाच्या गरजू रुग्णांसाठी मुंबईत हे एकमेव रुग्णालय असल्याने त्यावर भार पडत आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत देखील अशा पद्धतीच्या एका रुग्णालयाची गरज असल्याचे मत मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मंडळाचे यंदा सातवे वर्ष आहे. मागील वर्षी देखील मंडळाकडून भारताला ऑलिंपिक स्पर्धेत मिळालेलं यश या संकल्पनेवर आधारित देखावा उभारण्यात आला होता. या वर्षीचा टाटा रुग्णालयाचा देखावा हा संकुलातील रहिवासी रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर या तरुणांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.

हेही वाचा : डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसावर लाच मागितल्याचा गुन्हा ; पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे मागितली होती लाच

तसेच देखावा पूर्णपणे कागद आणि पुठ्यांच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे. गणेशाची मूर्ती देखील शाडूच्या मातीची आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा पूर्णपणे पर्यावरण पूरक असल्याचे संकुलातील रहिवासी रुपेश राऊत या तरुणाने संगितले आहे. यात हुबेहूब रुग्णालयाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रुग्णालयाचा आवार, बाहेर उभी असलेली वाहने, बस थांबा, रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांच्याही प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. हा देखावा पाहण्यासाठी डोंबिवलीतील नागरिक मोठया संख्येने मंडळाला भेट देत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The hospital in dombivli has been set up by the board a tribute to tata cancer hospital from ganeshotsav scene tmb 01