ठाणे: संपूर्ण राज्यातील बहुचर्चित असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अर्थात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या मे महिन्यात केले जाणार आहे. या मार्गावरील ७६ किलोमीटरचा टप्पा (इगतपूरी ते आमणे) शिल्लक होता. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा टप्पा सुरु झाल्यानंतर आता महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा टप्पा सुरु झाल्यानंतर ठाणे, मुंबई ते नागपूरचा प्रवास आठ तासात गाठता येणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेला हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या मार्गिकेच्या निर्माणाचे काम २०१९ पासून सुरु आहे. तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा ८० किमी इतका होता. हा मार्च २०२३ मध्ये सुरू झाला.

भरवीर ते इगतपुरी हा तिसरा २५ किमीचा टप्पा मार्च २०२४ मध्ये सुरू झाला. तर, चौथा, शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेला इगतपुरी ते भिवंडीतील आमणे गाव परिसराचा टप्पा ७६ किमी इतका आहे. या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात हा शेवटचा टप्पा सुरु करण्याचा विचार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु आहे.

हा महामार्ग खुला झाल्यास येथून मोठ्याप्रमाणात वाहतुक होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मार्गांवर होणारी कोंडीची समस्या सुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई वाहतुक करणारी वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाने ठाणे, मुंबईत वाहतुक करतील. परंतु पूर्व द्रुतगती महामार्ग ठाणे शहरात अत्यंत अरुंद आहे. त्यात या महामार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. तर माजविडा ते वडपे या मुंबई नाशिक महामार्गावर रुंदीकरणाचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे समृद्धीचा भार आल्यानंतर पुढे वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागू शकतो.

इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरांगातून गेला आहे. या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगदे असून या बोगद्यांची लांबी ११ किमी इतकी आहे. त्यातील इगतपुरी येथील बोगदा ८ किमी लांबीचा असून हा देशातील सर्वाधिक लांबी आणि रुंदीचा बोगदा आहे. या बोगद्यामुळे आठ मिनीटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येऊ शकते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांतून जातो. या प्रकल्पाची लांबी ७०१ किमी आहे. तीन-तीन पदरी मार्गिका असून या महामार्गावर ३२ मोठे पूल, ३१७ लहान आकाराचे पूल, वाहनांसाठी ६१ उन्नत मार्गिका, २२९ भुयारी मार्गिका, तर हलक्या वाहनांसाठी १२१ भुयारी मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. वन्यजीवांसाठी १८ भुयारी आणि आठ उन्नत मार्गिका आहेत.