आयएमएची कडोंमपाकडे आरक्षित भूखंडाची मागणी; ‘वेबीनार’ केंद्र स्थापण्याचे प्रयत्न
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या डोंबिवली शाखेने शहरात वैद्यकीय उपचार, माहिती आणि ग्रंथ, वैद्यकीय क्षेत्रातील पाक्षिक, मासिके एकाच ठिकाणी डॉक्टर्स, वाचकांना उपलब्ध व्हावीत, या उद्देशातून प्रशस्त वैद्यकीय ग्रंथालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय सेवेचे आदानप्रदान करण्यासाठी एकाच ठिकाणाहून जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर संपर्क साधता येईल; यासाठी ‘वेबीनार’ केंद्र ग्रंथालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या सगळ्या उपक्रमांसाठी प्रशस्त जागेची गरज आहे. त्यामुळे ‘आयएमए’ने कल्याण-डोंबिवली पालिकेकडे एक प्रस्ताव देऊन सर्वसमावेशक आरक्षणाखालील एखादी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेचे ३५० सभासद आहेत. शहरात विविध प्रकारच्या उपचार पद्धती करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा त्यात समावेश आहे. या सर्व डॉक्टर्सना एका व्यासपीठावर आणण्यासाठी, त्यांच्या एकत्रित विचार बैठकांमधून वैद्यकीय सेवेविषयक मंथन, रुग्णसेवाविषयक चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. संघटनेला प्रशस्त कार्यालय नसल्याने एकाचवेळी शहरातील डॉक्टर्स एका ठिकाणी जमणे शक्य होत नाही. यासाठी पालिकेने सर्वसमावेशक आरक्षणाखालील एखादा भूखंड ‘आयएमए’ला उपलब्ध करून दिला, तर वैद्यकीय ग्रंथालय, ‘वेबीनार’ केंद्रासारखे प्रश्न मार्गी लावणे शक्य होणार आहे, अशी माहिती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष डा़ॅ मंगेश पाटे यांनी दिली. संघटनेचे सीकेपी सभागृह परिसरात एक वैद्यकीय ग्रंथालय आहे, पण ती जागा अपुरी असल्याने त्या ठिकाणी पुस्तके ठेवणे, ऊठबस करणे शक्य होत नाही. यासाठी पालिका प्रशासनाला जागा मिळण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील पाटणकर चौकातील (फडके चौक) संकुलात पालिकेची ग्रंथालयाची जागा आहे. ही जागा मध्यवर्ती ठिकाणी आणि प्रशस्त आहे. त्यामुळे ही जागा आयएमएला पालिकेने उपलब्ध करून दिली तर डॉक्टर्स, अन्य बाहेरीला वाचकांना सोयीस्कर होईल, असे डॉ. पाटे यांनी सांगितले.
विविध प्रकारची वैद्यकीय सेवा क्षेत्रातील पुस्तके, संशोधन पेपर, आजार, रोगावर विश्लेषण करणारी पाक्षिके, मासिके ही सर्व ग्रंथसंपदा ‘आयएमए’च्या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा