ठाणे – भारतीय हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्याला ९ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे ठाणे शहरासह कल्याण- डोंबिवली मधील सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात विविध ठिकाणी वृक्ष उन्मळवून पडल्याच्या तसेच काही ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाल्या नाहीत. मागील पाच दिवसाच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ६४.८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी देखील ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील तीन ते चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना ९ जुलै पर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून तेथील स्थानिक जनतेला त्याबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Story img Loader