उल्हास नदीतून जलपर्णी हटवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवण्यात आली खरी पण त्यात सातत्य नसल्याने यंदा पुन्हा उल्हास नदीत जलपर्णीने नदीचे पात्र व्यापून घेतले. त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने उल्हासनगर महापालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारीपासून जलपर्णी हटवण्याचे काम सुरू केले होते. दोन आठवड्यात बहुतांश जलपर्णी हटवण्यात आली असली तरी ग्रामीण भागातून वाहून येणाऱ्या जलपर्णीमुळे नदी पात्र पुन्हा व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलपर्णी प्रतिबंध मोहिम सामूहिकपणे राबवण्याची मागणी होते आहे.
ठाणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक नागरिकांची तहान भागविणाऱ्या उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी अनेकदा चर्चा झाल्या मात्र त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात सातत्याने अपयश येते आहे. त्यामुळे उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा पडला आहे. परिणामी उल्हास नदीवर जलपर्णीचे आच्छादन दिसून येते आहे. जलपर्णी वाढल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या जलपर्णी वाढीचा वेग इतका होता की फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत जलपर्णी संपूर्ण नदीच्या पाण्यावर आच्छादनासारखी पसरली होती. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. अखेर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारी रोजी नदीतील जलपर्णी हटवण्याची मोहिम सुरू केली. या मोहिमेला आता यश येताना दिसत असून नदीतील उल्हासनगर महापालिका हद्दीतील सुमारे ७० टक्के जलपर्णी काढण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा- कल्याणमध्ये धावत्या लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा प्रवाशाच्या मारहाणीत मृत्यू
महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून लवकरच संपूर्ण जलपर्णी काढली जाईल असेही लेंगरेकर यांनी सांगितले आहे. मनुष्यबळ वापरून ही जलपर्णी काढली जात असून ती त्यासह नदी पात्रात टाकण्यात आलेला कचरा, वस्तू आणि निर्माल्यही हटवले जाते आहे. उल्हासनगर शहरात उल्हास नदीतून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणी उचल करून कॅम्प एक, दोन आणि तीन परिसरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे जलपर्णीमुळे पाणी उचल यंत्रणेवर परिणाम होऊ नये यासाठी जलपर्णी काढणे आवश्यक आहे.
सामूहिक प्रयत्नांची गरज
उल्हास नदीतून जलपर्णी मिटवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात आणि तत्कालीन पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सगुणा रुरल फाउंडेशनच्या मदतीने हर्बल फवारणी करून जलपर्णी संपवली होती . मात्र या मोहिमेला ब्रेक लागला परिणामी नदीतील प्रदूषणामुळे पुन्हा जलपर्णी वाढली. आता उल्हासनगर पालिका हद्दीबाहेर जो भाग येतो त्या वरप, कांबा आणि म्हारळ या ग्रामपंचायतीच्या नदीच्या भागातून जलपर्णी वाहून येते आहे. त्यामुळे येथे सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.