बदलापूर: २० ऑगस्ट रोजी बदलापुरात झालेल्या आंदोलनावेळी एका माध्यम प्रतिनिधीला अर्वाच्या आणि अश्लील शब्दात उद्देशून वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज गुरुवारी कल्याण न्यायालयाने फेटाळला. म्हात्रे यांनी कल्याण न्यायालयात अर्ज केला असतानाही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाबाबत आधी निर्णय देईल असे स्पष्ट करत त्यांचा अर्ज फेटाळला होता.

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी संतप्त पालक आणि नागरिकांनी २० ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती. या शाळेसमोर आंदोलन सुरू असताना तेथे वार्तांकन करणाऱ्या मोहिनी जाधव यांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य म्हात्रे यांनी केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. त्यावरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हात्रे यांनी अटकेपासून बचावासाठी कल्याण न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

हेही वाचा >>>शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने

 त्यावर गुरुवारी सुनावणी पार पडली. मोहिनी जाधव यांचे वकील ऍड. भूषण बेंद्रे यांनी जाधव यांची बाजू मांडली. वामन म्हात्रे हे आंदोलन दाबण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मोहिनी जाधव करत असलेल्या वृत्तांकनांचा त्यांना राग होता. तसेच यापूर्वी बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या अपुऱ्या कामावरूनही जाधव यांनी वृत्तांकन केल्याने म्हात्रे यांच्या मनात राग होता. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य सहज नसून पूर्ववैमनस्यातून आले असावे. त्यामुळे याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, अशी बाजू आम्ही न्यायालयात मांडली अशी माहिती ऍड. भूषण बेंद्रे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली आहे. आमची बाजू ऐकत न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे, असेही बेंद्रे म्हणाले. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.