कल्याण – कोणी कितीही आटापिटा केला तरी, यावेळी कल्याण लोकसभेतील उमेदवार मग ते विद्यमान खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे असोत की त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार उभा असो. यावेळी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची भाषा कोणत्याही उमेदवाराने करू नये. या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे, असे भाकीत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण ग्रामीणमधील विविध भागांतील सुमारे २६ कोटी ५० लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ मनसे आमदार पाटील यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – घरघंटी शिलाई वाटपावरुन युतीत बेबनाव; कल्याण-डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या विकास कामे, नागरी समस्यांच्या संदर्भातचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. या मतदारसंघातील एक मोठा वर्ग नाराज आहे. याशिवाय मागील दहा वर्षांत प्रस्थापित सरकारच्या विरोधात बेरोजगारी, महागाई आणि अन्य अशा अनेक कारणांने एक नाराजीचे वातावरण आहे. त्याचा फटका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार सत्ताधारी पक्षाचा असो, अन्यथा विरोधी पक्षातील असो. त्यांना बसणारच आहे. खासदार शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे नेृतृत्व केले आहे. पण आता पहिल्यासारखे या मतदारसंघात राजकीय वातावरण राहिलेले नाही, याचे भान आता या मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने ठेवणे आवश्यक आहे, असे आमदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.

लोकल प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याची सोडवणूक करण्यास कोणी पुढाकार घेत नाही. आतापर्यंत किती खासदारांनी लोकल प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या, असा प्रश्न करून केवळ रेल्वे स्थानकांची नावे बदलून उपयोग नाही तर पहिले लोकल प्रवाशांना सुखकारक प्रवास करता येईल यादृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात राहुल गांधी येताहेत पण, पत्रकार परिषद भलतेच घेताहेत; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप

बैलगाड्या शर्यत ही एक विरंगुळ्यासाठी असते. अनेकांची हौस असते. त्या भावनेतून राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. त्यामधून जर खून, हाणामाऱ्या होत असतील तर अशा शर्यतींचे प्रकार बंद केले पाहिजेत, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kalyan lok sabha candidate will pass by the margin information of mns mla pramod patil ssb