कल्याण- उल्हास नदीला पूर आल्याने बुधवारी दुपारी कल्याण-अहमदनगर महामार्गावरील रायते गावा जवळील पूल पाण्याखाली गेला. या महामार्गावरील मुरबाड, नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. गुरुवारी सकाळपासून रायते पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने या महामार्गावरील वाहतूक खुली करण्यात आली.

पुरामुळे पाण्याचा ओघ वेगवान होता. या प्रवाहात जंगल, सपाटीवरील लाकडी ओंडके, झाडांच्या फांद्या पुराच्या पाण्यात वाहून आले. ते पुलाच्या कठड्यांना अडकले. अधिक भाराने पुलाच्या काही भागातील कठडे तुटून पडले आहेत. वाहतुकीला अडथळा नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून पुलावरील झाडाच्या फांद्या, लाकडी ओंडके जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात केली.
रायता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने अनेक वाहन चालकांनी शहापूर, सरळगाव, नाशिक मार्ग अहमदनगर, जुन्नर भागात जाणे पसंत केले. या कोंडीत माल, भाजीपाला वाहू वाहने अडकली होती. गुरुवारी सकाळपासून रायता पूल वाहुकीसाठी खुला झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. कल्याण परिसरातील बहुतांशी नोकरदार वर्ग, व्यापारी रायता मार्गे मुरबाड, नगरकडे प्रवास करतात. बुधवारच्या मुसळधार पावसाने प्रवाशांचा खोळंबा झाला.

हेही वाचा >>>ठाण्यात चोवीस तासात २१४ मिमी पावसाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस

हेही वाचा >>>ठाणे : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला, तीनजण जखमी

कल्याण तालुक्यातील आपटी, चोण गाव परिसरातील पुराचे पाणी ओसरले आहे. बुधवारी या गावांचा इतर भागाशी असलेला संपर्क तुटला होता. उल्हास खोऱ्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी अद्याप धोका पातळीवरुन वाहत आहे.

“ पुराचे पाणी आता ओसरू लागले आहे. कल्याण तालुक्यात कोठेही गुरुवारी सकाळपासून पूरसदृश्य परिस्थिती, नागरी पाण्याने वेढली असल्याची परिस्थिती नाही. सुरक्षिततेचा उपाय योजना म्हणून तालु्क्यात राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान तैनात आहेत.”-जयराज देशमुख,तहसीलदार, कल्याण

Story img Loader