जागा हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रीयेला सुरुवात
वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख असा खाडीकिनारा मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असून या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधित होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला चंद्रपुर जिल्ह्यात पर्यायी जमीन देण्यात येणार आहे. या प्रस्तावास वनविभागाने संमती दर्शविल्यामुळे पालिका प्रशासनाने आता जागा हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रीयेला सुरुवात केली आहे. यामुळे गेले अनेक वर्षे कागदावर असलेल्या ठाण्याच्या खाडीकिनारी मार्गातील मोठा अडथळा दूर झाला असून या मार्गाच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई; रस्ते, पदपथ मोकळे
घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खाडीकिनारा मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. खारेगाव ते गायमुख असा १३ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी महापालिका प्रशासनाने १३१६ कोटी १८ लाख रुपयांचा आराखडा तयार करून तो एमएमआरडीएकडे सादर केला होता. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रस्तावास एमएमआरडीएने मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याचे निर्देश एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने या विभागांकडून आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रीया सुरु केली होती. या प्रक्रीयेचा एक भाग म्हणून या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधीत होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला पर्यायी १५ हेक्टर इतकी जागा हस्तांतरित करावी लागणार असून त्यासाठी पालिकेने वनविभागाला पर्यायी जागा देण्यासाठी जागेचा शोध सुरु केला होता. गडचिरोली, सातारा, पालघर या जिल्ह्यांतील जागांचा पर्याय ठाणे महापालिकेने पुढे आणला होता. मात्र, वनीकरणासाठी ही जागा अनुकूल नसल्यामुळे वनविभागाने या जागांचे प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर पालिकेने चंद्रपुर जिल्ह्यातील जागेचा शोध घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव वनविभागाला दिला होता. या प्रस्तावास वनविभागाने संमती दर्शविल्यामुळे खाडीकिनारी मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
हेही वाचा >>>डोंबिवलीत ‘बहुरुपी’ पोलिसांच्या त्रासाने व्यावसायिक, व्यापारी हैराण; पाठलाग केल्यानंतर बहुरुपी गेले पळून
खाडीकिनारी मार्गासाठी महापालिका प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रीया सुरु केली होती. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून या मार्गातील कांदळवन क्षेत्र बाधित होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला पर्यायी जमीन द्यावी लागणार आहे. या संबंधी प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावस सर्वसाधारण सभेने यापुर्वीच मान्यता दिलेली आहे. या प्रस्तावानुसार या जागेच्या खरेदीसाठी ठाणे महापालिका वनविभागाकडे जमा करावी लागणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यात अखेर पर्यायी जागा देण्याचा निर्णय अखेर झाला असून यामुळे जागेचा शोध संपला आहे.