ठाणे : नवी मुंबई येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर दोन वर्षांपुर्वी ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या एका दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये दिले.
नवीन पनवेल खांदा काॅलनी येथे पंकज शेडगे (३७) राहत होते. ते कांजुरमार्ग येथील इन्ग्राम मायक्रो इंडिया एसएससी प्रायव्हेट लिमिटेड या परदेशी कंपनीत काम करत होते. ९ डिसेंबर २०२२ रोजी ते काही कामानिमित्त पनवेल – मुंब्रा मार्गावरून दुचाकीने जात होते. या प्रवासादरम्यान एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नवी मुंबई येथील कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा…कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
या प्रकरणी पंकज यांच्या कुटुंबीयांनी अपघात न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी शनिवारी ठाण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने आयोजित केलेल्या लोकअदालतीत झाली. या सुनावणीत न्यायालयाने पंकज यांच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधीश एस.एन शाह यांनी दिले. शेडगे यांच्यातर्फे जी. ए विनोद यांनी तर विमा कंपनीच्यावतीने अरविंद कुमार तिवारी यांनी बाजू मांडली.