ठाण्यातील गावदेवी भागात एका रिक्षात विसरलेला एक लाख २० हजार रुपयांचा कॅमेरा ओंकार डिंगोरे या विद्यार्थ्याला परत मिळाला आहे. कॅमेरा परत मिळाल्याने ओंकारने पोलिसांचे आभार मानले.डोंबिवली येथे ओंकार हा वास्तव्यास असून तो मुंबईतील एका महाविद्यालयात ‘बीएमएम’मध्ये शिक्षण घेत आहे. एका विषयासाठी त्याला लघु चित्रपट बनवायचा असल्याने त्याने महिन्याभरापूर्वी एक लाख २० हजार रुपयांचा कॅमेरा खरेदी केला होता. सुमारे १० दिवसांपूर्वी लघु चित्रपट बनविण्यासाठी तो महाविद्यालयातील मित्रांसह ठाण्यातील वसंत विहार भागात आला होता. चित्रीकरण झाल्याने सर्वजन रिक्षाने घरी परतत होते. रिक्षा ठाणे रेल्वे स्थानक येथील गावदेवी मंदीर परिसरात आली. ओंकार मित्रांसोबत रिक्षातून उतरला. परंतु कॅमेरा रिक्षातच विसरला. काही अंतर ते पुढे आले असता कॅमेरा रिक्षामध्येच राहिल्याचे त्यांना कळाले. त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. त्यानंतर ओंकारने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, घरी जात असताना तो पुन्हा रिक्षा चालकाचा शोध घेऊ लागला. त्यावेळी परिसरातील दुकानदारांनी त्याला कोपरी वाहतूक शाखेचे साहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांना भेटण्यास सांगितले. ओंकारने त्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर प्रवीण जाधव यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून रिक्षाचा वाहन क्रमांक मिळविला. हा रिक्षा चालक भिवंडीमध्ये वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जाधव यांनी भिवंडी येथे जाऊन रिक्षा चालकाकडील कॅमेरा जप्त केला. सुमारे १० दिवसांपासून या कॅमेऱ्याचा शोध सुरू होता. वाहतूक शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते ओंकारला कॅमेरा सूपूर्द करण्यात आला. यावेळी साहाय्यक आयुक्त कवयित्री गावित, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड आणि प्रवीण जाधव उपस्थित होते. कॅमेरा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे ओंकार याने सांगितले.