ठाणे : मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ओसामा शेख याला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. याप्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ओसामा शेख याचा मागील सुमारे साडेतीन वर्षांपासून पोलीस शोध घेत होते. त्याला ठाण्यात आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
हेही वाचा – अन्यथा सगळ्यांचीच सफाई होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना इशारा
हेही वाचा – भिवंडीतील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये राबोडी येथील हबीब शेख याला देखील पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात मुख्य आरोपी ओसामा याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. नुकतीच ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे हत्येमागील गुढ उलगडण्याची शक्यता आहे.