कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्या विरोधात सामाजिक संस्थांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी लदवा यांची फुले नाट्यगृहातून तडकाफडकी शुक्रवारी बदली केली.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पदभार कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार म्हणून सोपविण्यात आला आहे. लदवा यांची बदली कल्याणमधील अत्रे नाट्यगृहात व्यवस्थापक म्हणून करण्यात आली होती. लदवा यांची अत्रे नाट्यगृहात बदली करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याणमधील नाट्य, गायन, साहित्य-सांस्कृतिक सस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी तातडीने आयुक्त डाॅ. दांगडे यांना संपर्क केला. कोणत्याही परिस्थितीत लदवा यांना अत्रे नाट्यगृहाचा पदभार देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. जो गोंधळ लदवा यांच्याकडून फुले नाट्यगृहात घातला जात होतो, तोच प्रकार ते अत्रे नाट्यगृहात सुरू करतील, अशा तक्रारी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी करताच आयुक्तांनी तातडीने लदवा यांना अत्रे नाट्यगृहाचा पदभार स्वीकारण्यास मज्जाव केला.
तक्रारदार राहुल दामले यांनीही लदवा यांना पालिकेतील नागरिकांचा संपर्क नसलेल्या ठिकाणी लदवा यांना पदस्थापना देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे सूचित केले असल्याचे समजते. लदवा यांच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील मनमानी, गोंधळाविषयी डोंबिवलीतील सामाजिक, साहित्यिक संस्था, तसेच माजी नगरसेवक राहुल दामले यांनी तक्रारी केल्या होत्या. दामले यांनी आयुक्तांची भेट घेऊन लदवा यांच्याकडून सुरू असलेल्या मनमानी, तारखा वाटप, तेथे वाढीव मंच लावण्यावरून उकळण्यात येत असलेले पैसे या विषयावरून तक्रारी केल्या होत्या. तसेच नाट्यगृह आवारात प्रेक्षकांना दुचाकी वाहने उभी करण्यास ते मज्जाव करत होते. या तक्रारींची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली.
हेही वाचा – जी-२० च्या प्रदर्शनात भांडारकर संस्थेतील ‘ऋग्वेद’
लदवा यांची फुले नाट्यगृहातून उचलबांगडी होताच शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी समाधान व्यक्त केले. फुले नाट्यगृहात नियमित सामाजिक संस्थांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे या नाट्यगृहात साहित्यिक, सांस्कृतिक, कवीमन असलेल्या पालिका कर्मचाऱ्याची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, राज्य पुरस्कार मिळविणारे काही कर्मचारी सक्रिय आहेत. त्यांची वर्णी लावली तर नाट्यगृहांना नवे रूप येईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.