भाज्यांपासून मांसाहारापर्यंत आणि घरांपासून प्रवासापर्यंत सर्वासाठी जादा पदरमोड
डोंबिवलीची भाजी मंडई असो वा मासळी बाजार, येथे ग्राहक विक्रेते सांगतील त्या किमतीला वस्तू खरेदी करीत असल्याने जिल्ह्य़ातील इतर शहरांच्या तुलनेत या शहरातील जगणे अधिक महाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भाज्या, खाद्यपदार्थ आणि मासळीच्या किमती शहरात अवाच्या सवा वाढू लागल्या आहेत. खरेदी करण्यासाठी येणारा ग्राहक मालाला हवी ती किंमत देत असल्याने विक्रेते वाट्टेल ती किंमत सांगत आहेत. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे मार्केट अवघ्या काही अंतरावर असताना डोंबिवलीत मात्र भाज्यांचे दर मात्र कमालीचे वाढलेले दिसतात. तसेच सकाळच्या वेळी येणाऱ्या मासळीचे भावही चढेच असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्राहक घासाघीस करीत नाही, सांगेल त्या किमतीमध्ये माल खरेदी करतो. त्यामुळे हे भाव वाढत असल्याचे येथील ग्राहकांचे निरीक्षण आहे. तर येथील ग्राहक प्रचंड घासाघीस करीत असल्याने वाढीव भाव सांगावे लागतात, असा सूर येथील विक्रेते आळवताना दिसतात.
डोंबिवली शहरात उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, स्थानिक आगरी, कोळी लोकांची वस्ती आहे. स्थानिकांपैकी अनेक जण राजकारणात तर काही जण बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. बाहेरून येऊन स्थायिक झालेले बरेच जण नोकरदार आहेत. सकाळी मुंबईमध्ये कामाला जायचे आणि संध्याकाळी घरी यायचे असा लाखो डोंबिवलीकरांचा दिनक्रम आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर घरी जाता जाता रस्त्यातच खरेदी करण्याचा अनेक डोंबिवलीकरांचा दिनक्रम आहे. अशा वेळी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडे खरेदी केली जात असून वेळ नसल्याने विक्रेता सांगेल ती किंमत मोजून माल खरेदी करण्याचा प्रयत्न येथील नोकरदार करताना दिसतात. विक्रेत्यांचे मत मात्र वेगळे आहे. त्यांच्या मते डोंबिवलीत वाहतूक खर्च अधिक आहे. त्यात डोंबिवलीकर वस्तू घेताना खूप घासाघीस करतात. त्यामुळे आधीच दर वाढवून सांगतो, असे त्यांचे म्हणणे आहे. डोंबिवलीमध्ये स्वस्त भाजी विक्रीची ठिकाणे नसल्याने विक्रेता सांगेल त्याच दरात फळे, भाज्या, मासे आणि कोंबडी खरेदी करावी लागत असल्याची व्यथा व्यक्त केली जाते.
प्रवासासाठी मनमानी भाडे..
भाजी, मासळी आणि घरे डोंबिवलीमध्ये महाग आहेत. शिवाय इथला प्रवासही तितकाच महाग आहे. डोंबिवलीमध्ये प्रामुख्याने शेअर रिक्षा चालवल्या जात असून मीटर रिक्षा आणि प्रिपेड रिक्षा या स्मार्ट होऊ पाहणाऱ्या शहरात अद्याप नाहीत. त्यामुळे शेअर रिक्षा जात नसलेल्या भागात जायचे झाल्यास रिक्षा चालक सांगेल ते मनमानी भाडे देऊन प्रवास करावा लागतो. हे भाडे अवघ्या तीन ते चार किमीसाठी शंभर ते पाचशे रुपये इतके प्रचंड असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुस्तपणामुळे डोंबिवलीकरांची लूट होत असून डोंबिवली शहर महागाईच्या खाईत लोटले जाऊ लागले आहे.
डोंबिवलीत काय महाग?
* भाज्यांच्या दरात किलोमागे १०-२० रुपयांचा फरक
* मासळीचे दर १० ते २० टक्क्यांनी जास्त
*कोंबडी, मटणाच्या दरांतही ३० ते ४० रुपयांची वाढ
* मीटरनुसार रिक्षावाहतूक पूर्णपणे बंद; शेअर भाडेही जास्त
* अनधिकृत घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर