ठाणे : ठाणे पुर्व रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलावर एका महिलेला फेरिवाल्याने मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या घटनेनंतर संताप व्यक्त होऊ लागताच, ठाणे महापालिका प्रशासनाने स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ आणि पुलावरील रस्ता अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेची पथके कारवाईसाठी येताच काही दुकानदार फेरिवाल्यांचे साहित्य दुकानामध्ये लपवून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची बाब या कारवाईदरम्यान पालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील काही दुकानदार आणि फेरिवाल्यांची हातमिळवणी असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले असून फेरिवाल्यांना आसरा देणाऱ्या अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याण: ‘दिवाळी भेट’ चार दिवसात लाभार्थींच्या हातात; अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

ठाणे पुर्व (कोपरी) परिसरात राहणारी एक ५२ वर्षीय महिला काही कामानिमित्त दादर येथे गेली होती. तेथून घरी परतण्यासाठी त्या लोकलने ठाणे स्थानकात आल्या. या स्थानकातील मुंबई दिशेकडील जुन्या पूलावरून कोपरीच्या दिशेने जात असताना पादचारी पूलावरील शाकीर शेख या फेरीवाल्याच्या बाकड्याला त्यांचा धक्का लागला. या कारणावरून वाद सुरु असतानाच तिथे आलेल्या भालचंद्र डोकरे आणि त्याच्या सहकाऱ्याने त्या महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. पोलिसांनी शाकीर आणि डोकरे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी कायम असल्याचे चित्र पुढे आले होते. तसेच या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागताच, ठाणे महापालिका प्रशासनाने स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ आणि पुलावरील रस्ता अडविणाऱ्या फेरिवाल्यांविरोधात गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरु केली असून या कारवाईदरम्यान, काही दुकानदारांकडून फेरिवाल्यांना आसरा देऊन त्यांना कारवाई होण्यापासून कसे वाचविले जाते, ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.

हेही वाचा >>> राजन विचारेंच्या ‘त्या’ पत्रावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्याबद्दल खासदार राजन विचारेंचे आभार”

पालिकेची पथके कारवाई करण्यासाठी येणार असल्याची माहिती फेरिवाल्यांना आधीच मिळायची आणि पथक येण्यापुर्वीच फेरिवाले तेथून निघून जातात. त्यानंतर पथक माघारी फिरताच फेरिवाले पुन्हा त्याठिकाणी परतून ठाण मांडून बसतात, हे चित्र सातत्याने दिसून येत आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे हे स्वत: पथकासोबत कारवाईसाठी गेले असता, त्यांना पथक येताच फेरिवाले जातात कुठे आणि त्यांचे साहित्य कुठे लपवून ठेवतात, याची माहिती मिळाली आहे. कारवाईदरम्यान काही दुकानदार फेरिवाल्यांना त्यांचे साहित्य लपविण्यासाठी आसरा देत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. तहसील कार्यालय परिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात फेरीवाले आपले साहित्य लपवत असल्याचे दिसून आले आहे. तसेच पालिकेची पथके कारवाईसाठी येताच काही दुकानदार फेरिवाल्यांचे साहित्य दुकानामध्ये लपवून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा >>> ठाणे: दिवाळी निमित्ताने आजपासून ठाण्यात वाहतूकीत बदल

पालिकेचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानक परिसरात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही दुकानदार फेरिवाल्यांचे साहित्य दुकानात लपवून ठेवण्यासाठी मदत करीत असल्याची बाब समोर आली असून यापुढे असे केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

– गजानन गोदेपुरे, उपायुक्त ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The municipality will file case against the shopkeepers provide support in thane station area ysh