डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा जणू पालिकेने फेरीवाल्यांना आंदण दिला आहे अशा पध्दतीने फेरीवाले डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ अडवून सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी फ आणि ग प्रभागातील सुमारे ३५ हून अधिक कामगार नियुक्त आहेत. कामगार, अधिकाऱ्यांचे संगनमत आणि फेरीवाल्यां बरोबरील साट्यालोट्यांमुळे फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही डोंबिवलीतील साहाय्यक आयुक्तांना मोकळे रान सोडल्याचे बोलले जात होते. ग आणि फ प्रभागाचा अनेक महिने आयुक्त सूर्यवंशी यांच्याशी सलगी करून पदभार स्वताकडे ठेवण्यात धन्यता मानणारे सध्याचे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे गरजेचे आहे. त्यांचेही ते उपजीविकेचे साधन आहे अशी भूमिका घेऊन फेरीवाल्यांची पाठराखण करत होते.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांना हटविण्यात टाळाटाळ करत असल्याने साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, फेरीवाला हटाव पथकातील कामगार अरूण जगताप यांच्या अनेक तक्रारी मागील काही महिन्यात आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या. त्या दुर्लक्षित करून आयुक्तांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची वेळोवेळी पाठराखण केली.

कामगार जगताप हा डोंबिवली एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा समर्थक असल्याने त्याची डोंबिवलीतील फ प्रभागातून कधीच बदली केली जात नाही. जगताप यांचे फेरीवाल्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे.आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी फेरीवाले ही पण कल्याण, डोंबिवलीतील गंभीर समस्या असल्याचे निदर्शनास आले. सर्व प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना अडथळा होईल अशा पध्दतीने फेरीवाले बसत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिले आहेत. आयुक्त डॉ. दांगडे यांनी पदभार स्वीकारल्या पासून सकाळच्या वेळेत अचानक पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यामुळे प्रभाग नियंत्रक साहाय्यक आयुक्त सतर्क झाले आहेत.

फेरीवाले गायब

आयुक्त डॉ. दांगडे यांनी अचानक डोंबिवली पूर्व भागात भेट दिली आणि फेरीवाल्यांचे त्यांना दर्शन झाले तर कारवाईला सामोरे जायला नको म्हणून दररोज सकाळी आठ पासून ते रात्री ११ वाजेपर्यंत डोंबिवली पूर्वेतील पाटकर रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, फडके रस्ता, डॉ. रॉथ रस्ता, मानपाडा रस्ता, उर्सेकरवाडी, रामनगर भागात बसणारे फेरीवाले दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. आयुक्त दांगडे यांच्या करड्या शिस्तीचा धसक्याचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांना कायमचे हटविण्यासाठी आयुक्तांनी प्रथम माजी आयुक्त सूर्यवंशी यांचे खास साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, कामगार अरुण जगताप यांची अन्य प्रभागात किंवा मुख्यालयात बदली करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काही महिन्यापूर्वी दोन वेळा सावंत यांच्या बदलीच्या हालचाली मुख्यालयात झाल्या पण आयुक्तांचा खास म्हणून त्या रद्द झाल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मनसेचे शहरप्रमुख मनोज घरत यांनी फेरीवाल्यांच्या विषयावर नाराजी व्यक्त केली होती.

आयुक्तांचा दणका

बुधवारी सकाळी आयुक्त डॉ. दांगडे यांनी कल्याण पश्चिम येथील शिंदे मळा, पारनाका, स्वानंद नगर, सुभाष मैदान येथील सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्याला भेट दिली. त्यावेळी तेथील अस्वच्छता, गैरहजर कामगार यांची यादी पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त धैर्यशील जाधव यांना दिले. आयुक्तांनी कठोर शिस्तीचा बडगा उगारण्यास सरुवात केल्याने वतनदारासारखे मिरविणाऱ्या अधिकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new commissioner in dombivli has started taking action against street hawkers amy
Show comments