अमुक समाजातील लोकांनी अमुकच व्यवसाय करावा, असा प्रघात भारतीय समाजव्यवस्थेत प्राचीन काळापासून सुरू आहे. आजही आपला पिढीजात व्यवसाय करण्यात अनेक जण धन्यता मानत असतात. मात्र, आर्थिक स्थैर्य राखायचे असेल तर बदलत्या काळानुसार व्यवसायात बदल करावाच लागतो. याचेच प्रत्यंतर डोंबिवलीतील फडके रोडवर उत्तम मिठाईचे दुकान असा लौकिक असणाऱ्या ‘कुळकर्णी ब्रदर्स’च्या पुढच्या पिढीने दाखवून दिले आहे. आपल्या गोड व्यवसायाची परंपरा पुढे नेण्याऐवजी चिन्मय कुळकर्णी या तरुणाने ‘तंदूर एक्स्प्रेस’ हे मांसाहरी खाद्यपदार्थाचे दुकान थाटले आहे. आजवर मांसाहारी पदार्थावर काट मारणाऱ्या फडके रोडवर चिन्मयने थाटलेल्या ‘तंदूर एक्स्प्रेस’ची आणि कुळकर्णी यांच्या तिखट धाडसाची चर्चा अवघ्या शहरात सुरू झाली आहे.डोंबिवलीकरांच्या भावविश्वात फडके रोडला विशेष स्थान आहे. गणेश मंदिर देवस्थानच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नववर्ष स्वागत यात्रेचा केंद्रबिंदू फडके रोडच आहे. या रस्त्यावर निरनिराळ्या गृहपयोगी वस्तू, ज्वेलर्स, बँका, कपडय़ाची दुकाने, कार्यालये, भाजी मंडई तसेच हॉटेल्स असली तरी कुठेही मांसाहारी पदार्थ मिळण्याची सोय नव्हती. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या चिन्मय कुळकर्णी या तरुणाच्या हे लक्षात आले. त्यामुळे चांगले बस्तान बसवून असलेल्या ‘कुळकर्णी ब्रदर्स’ या आपल्या मिठाईयुक्त गोड परंपरेचे पालन करण्यापेक्षा व्यावसायिक हित लक्षात घेऊन त्याने जाणीवपूर्वक या तिखट वाटेने जाण्याचा निर्णय घेतला.‘फडके’ रोडवरील तंदूर एक्स्प्रेसमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ मिळतात. यामध्ये ३ प्रकारचे तंदूर, १५ विविध डोंबिवलीच्या फडके रोडवर ‘तंदुरी एक्स्प्रेस’प्रकारचे कबाब आणि पंजाबी पदार्थाचा समावेश आहे. तंदूर एक्स्प्रेसमधील पहाडी तंदूर, चिकन रेशमी कबाब, पनीर मलाई टिक्का, पनीर स्पायसी टिक्का, टिक्का दम बिर्याणी आदी पदार्थ ग्राहकांच्या विशेष पसंतीचे. २३ वर्षीय चिन्मय कुळकर्णी दुकानाचे व्यवस्थापन पाहतो, तर त्याचा सहकारी अभिजीत चौगुले ‘कॉर्नर’चे किचन सांभाळतो. ‘नेरुळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर परदेशातून नोकरीच्या संधीही चालून आल्या. मात्र, काही तरी हटके करण्याच्या विचारातून ‘तंदुरी एक्स्प्रेस’ची कल्पना सुचली. कुटुंबीयांनीही त्याला पाठिंबा दिला,’ असे चिन्मय सांगतो. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात भुवया उंचावणारा ग्राहक वर्ग आता तंदूर एक्स्प्रेसचा मुख्य ग्राहक बनला आहे, असे चिन्मय सांगतो.
‘आमच्या मिठाईच्या व्यवसायाचा वारसा चिन्मय पुढे घेऊन जाईल, असे सुरुवातीला वाटले होते. चिन्मयने त्याच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणाला अनुसरूनच स्वत:चे स्नॅक्स कॉर्नर सुरू केले. त्यामुळे त्यात वावगे असण्याचे काहीच कारण नाही. मांसाहारी पदार्थाच्या व्यवसायात मराठी माणूस अग्रेसर आहे. त्यामुळेच माणूस कुठला व्यवसाय करतो हे महत्त्वाचे नसून त्यामागची त्याची चिकाटी जास्त महत्त्वाची असते, असे मला वाटते,’ असे चिन्मय यांचे वडील श्रीपाद कुळकर्णी यांनी सांगितले.
डोंबिवलीचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या ‘फडके रोड’वर आपले स्वत:चे दुकान असावे, अशी डोंबिवलीतील प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते. ‘तंदूर एक्स्प्रेस’ हे माझे दुकान ‘फडके रोड’वर सुरू झाल्याने माझी ती इच्छा पूर्ण झाली. फडके रोडवर सामिष पदार्थाचे दुकान सुरू करायचे असल्याने सुरुवातीच्या काळात दडपण होते. परंतु दुकान सुरू झाल्यानंतर आठवडय़ाभरातच मिळालेल्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे हे दडपण नाहीसे झाले.
– चिन्मय कुळकर्णी,डोंबिवली