लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकातील दिवा बाजूकडे नव्याने बांधण्यात आलेले तिकीट घर काही महिन्यांपासून बंद आहे. हे तिकीट घर लवकर सुरू करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. हे तिकीट घर बंद असल्याने प्रवाशांना फलाटावरुन पायपीट करत कोपर रेल्वे स्थानकाच्या डोंबिवली दिशेला यावे लागते, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून रेल्वेने कोपर रेल्वे स्थानकाच्या दिवा बाजुकडे काही महिन्यापूर्वी पाच तिकीट खिडक्या असलेले तिकीट घर बांधून ठेवले आहे. आयरे, कोपर बाजुकडील दिवा दिशेने राहत असलेल्या, आगासन, म्हातार्डी परिसरातून रेल्वे मार्गातून पायी येणाऱ्या प्रवाशांना दिवा बाजूकडील तिकीट घर सोयीचे आहे. आता नवीन तिकीट घर बंद असल्याने प्रवाशांना फलाटाच्या दिवा बाजुने डोंबिवली दिशेकडे चालत यावे लागते. लोकल पकडण्याची घाई असलेले काही प्रवासी तिकीट काढण्यासाठी मोठे अंतर कापून जावे लागेल. याविचाराने तिकीट न काढताच प्रवास सुरू करतात. महिला प्रवाशांचे यामध्ये हाल होतात.

हेही वाचा… रुक्मिणीबाई रुग्णालयातील घटनेची अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी; मनसेचे पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

नवीन तिकीट घर बंद असल्याने तेथे गर्दुल्ले, मद्यपी दिवसा, रात्रीच्या वेळेत ठाण मांडून असतात. भटकी कुत्री याठिकाणी बैठक मारुन घाण करतात. हे तिकीट घर सुरू करावे, अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे. या तिकीट खिडकीचा वापर आयरे, कोपर, आगासन परिसरातील नागरिक करणार आहेत. या भागातील प्रवाशांना नेतृत्व नसल्याने या बंद तिकीट खिडकीविषयी कोणीही प्रवासी आवाज उठविताना दिसत नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या खिडक्या सुरू करण्यात येत नाहीत, असे रेल्वे सुत्रांकडून समजते.

हेही वाचा… एअरफोर्सच्या जागेवर हेलिपॅड उभारा; आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोपर रेल्वे स्थानकातील सरकात जिना बंद आहे. तो लवकर सुरू करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. कोपर रेल्वे स्थानकातून येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे तरीही रेल्वे प्रशासन या स्थानकातील प्रवासी सुविधांकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुला रेल्वे प्रवेशव्दाराच्या दारात दुचाकी वाहने उभी करुन ठेवलेली असतात. इतर खासगी वाहने बेशिस्तीने उभी केलेली असतात. रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करुन मग रेल्वे स्थानकात यावे लागते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new ticket office at kopar railway station is closed dvr
Show comments