कल्याण: ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. या तालुक्यातील आदिवासी वाडी, गावांमध्ये एक हजार १६१ कुपोषित बालके आहेत. यामधील ८३ बालकांमधील कुपोषणाची तीव्रता अधिक आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अहवालातून ही माहिती उघड झाली असून, या प्रकरणी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड, शहापूर परिसर हा ग्रामीण, दुर्गम आहे. या भागात सरकारी आरोग्य केंद्रे आहेत. तेथे मनुष्यबळाचा अभाव आहे. अंगणवाडी चालकांना बालकांचे संगोपन कामे देण्यात आली आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे ही कामे प्रभावीपणे होत नाहीत. आदिवासी पाडे, गावांमध्ये नियमितचे बालकांचे सर्वेक्षण, आरोग्य चाचणी होत नाही. यापूर्वी हे प्रकार दर दोन महिन्यांनी होत होते. कुपोषणाचे प्रमाण ग्रामीण, दुर्गम भागात वाढत आहे, असे आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या एका जाणकाराने सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील कुपोषित मुलांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी या तालुक्यातील कुपोषित मुले असलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिंदल यांनी दिले आहेत. येत्या सहा महिन्यात जिल्हात एकही कुपोषित बालक दिसणार नाही यादृष्टीने उपाययोजना करा. ठाणे जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी दत्तक पालक योजना, कुपोषण मुक्ती अभियान सुरू करण्याचे निर्देश जिंदल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा… भिवंडीत कत्तल केलेल्या म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनावट तूप

कुपोषित बालक असलेल्या भागात दर पंधरा दिवसांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी फेरी मारून बालकाच्या प्रगतीचा आडावा घ्यावा. आरोग्य रूग्णालयातील परिचारिका, अंगणवाडी सेविका यांंनी नियमित या बालकाचे संगोपन, त्याला पोषण आहार वेळेत मिळतो की नाही याची खात्री करावी, अशा सूचना जिंदल यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. गाव, वाडे, पाड्यात फिरण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने गावातील साथी, कुपोषणाची माहिती वेळेत जिल्हास्तरावर उपलब्ध होत नाही. अंगणवाडी सेविकांवर बालकांचे संगोपन जबाबदारी असली तरी त्यांच्यावर अनेक शासकीय कामाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्य आहेत. त्यांच्या मूळ कामावर बंधने आली आहेत, असे एका ग्रामस्थाने सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. आरोग्य, स्थानिक कर्मचारी, अधिकाऱ्यांना कृती आराखड्यानुसार काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. – मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद.

करोना पूर्वी आम्ही शहापूर, मुरबाड भागात नियमित आरोग्य शिबीरे घेऊन कुपोषित बालकांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करत होतो. त्या मुलांच्या आरोग्यात प्रगती होईल यासाठी प्रयत्नशील होतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होतो. करोनानंतर या भागातील काम थांबले आहे. बालरोगतज्ज्ञांचा चमू उपलब्ध झाला तर हे काम पुन्हा या भागात सुरू करण्याचा विचार आहे. – प्रमोद करंदीकर, शबरी सेवा समिती, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of malnourished children is increasing in the remote areas of murbad shahapur taluka of thane district dvr