ठाणे – मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील हवा प्रदूषित असल्याचे अनेकदा विविध अहवालांतून समोर आले आहे. असे असतानाच आता जिल्ह्यातील विविध प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे जाहीर करण्यात येणाऱ्या संवर्गनिहाय कारखान्यांच्या अहवालातून जिल्ह्यात २ हजार २९४ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक ६० पेक्षा अधिक म्हणजेच प्रदूषणकारी असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर ४१ ते ५९ इतका प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यांची संख्या देखील १ हजार ८९५च्या घरात आहे. तर यामध्ये सर्वाधिक १०९७ इतक्या प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या ठाणे जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता अनेकदा खराब असल्याचे विविध अहवालांतून समोर येत असते. कारखाने आणि वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे या अहवालातून दिसून येत असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रदूषण रोखण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत असल्या तरी अनेक कारखान्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्याच्या हवा आणि पाणी प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कारखान्यांतून उत्सर्जित होणारे वायू आणि सोडण्यात येणारे सांडपाणी यांचे नमुने घेऊन प्रत्येक कारखान्याचा प्रदूषण निर्देशांक ठरविण्यात येतो. यानुसार जिल्ह्यातील २ हजार २९४ कारखान्यांचा निर्देशांक हा ६० हून अधिक आहे. यामुळे हे कारखाने इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक प्रदूषणकारी असल्याचे समोर आले आहे. तर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात वेळोवेळी दंडात्मक आणि कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्यातील स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या विभाग कार्यालयातून देण्यात आली आहे.
हेही वाचा – ठाणे: घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांवर अखेर वाहतुक सुरक्षा घटक
ठाणे तालुक्यात सर्वाधिक प्रदूषण
ठाणे येथील वागळे इस्टेट आणि नवी मुंबई येथील बेलापूर या भागात ४ हजार ६०७ कारखाने आहेत. यातील १०९७ कारखाने हे लाल संवर्गातील म्हणजेच प्रदूषणकारी कारखाने आहेत. यामुळे जिल्ल्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत ठाणे तालुक्यात सगळ्यात अधिक प्रदूषणकारी कारखाने असल्याचे दिसून येत आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यात प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या ही ४३३, अंबरनाथ ३६०, कल्याण ३०९, मुरबाड ४८, शहापूर ३२ आणि उल्हासनगरमध्ये १५ कारखाने आहेत.
या कारखान्यांचा समावेश
६० हून अधिक प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यामध्ये रासायनिक कारखाने, औषध निर्मिती करणारे कारखाने, कपड्यांवर प्रकिया करून रंगकाम करणारे कारखाने यांचा समावेश होतो. यामध्ये रासायनिक कारखान्याधून उत्सर्जित्, होणाऱ्या वायूमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत तर इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याधून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.
संवर्गनिहाय कारखाने
६० पेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक (लाल श्रेणी) – २२९४
४१ ते ५९ दरम्यान प्रदूषण निर्देशांक (नारंगी श्रेणी) – १८९५
२१ ते ४० दरम्यान प्रदूषण निर्देशांक (हिरवी श्रेणी) – ३४५०
२० पर्यंत दरम्यान प्रदुषण निर्देशांक ( पांढरी श्रेणी ) – ११४१