डोंबिवलीतील एका चारचाकी वाहन मालकाचे वाहन तीन जणांना विक्री करुन त्यांच्याकडून पैसे उकळून मूळ वाहन मालकाची फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय सहदेवकर (रा. देवीचापाडा, डोंबिवली) उमेश मेंगाडे (रा. डोंबिवली), सीमान सय्यद, इमरान खान (रा. भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. मागील तीन महिन्याच्या काळात डोंबिवली जवळील सोनारपाडा गावातील साईबाबा मंदिर जवळ हा प्रकार घडला आहे. सुरज अनिल पाटील (३१, रा. आशा निवास, शिवसेना शाखेजवळ, सोनारपाडा, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार सुरज पाटील यांची मारुती सुझुकी कार होती. ही कार त्यांनी बँकेतून कर्ज घेऊन खरेदी केली होती. १० लाख रुपये किमतीचे हे वाहन सुरज यांना विकायचे होते. त्यासाठी त्यांनी कर्जाचे सगळे हप्ते फेडून वाहन विक्रीसाठी आपल्या विश्वासातील विजय सहदेवकर यांच्या ताब्यात दिले. विजय यांनी सुरज यांचा विश्वासघात करुन त्यांचे वाहन उमेश मेंगाडे यांच्या मार्फत दोन लाख ५० हजार रुपयांना भिवंडी येथील निवासी सीमान सय्यद यांना विकले. सीमान यांनी सुरज यांची मारुती सुझुकी इमरान खान यांना विकली.
दोन महिने उलटुनही विजय सहदेवकर वाहन विक्रीविषयी काहीच बोलत नाही. तो उडवाउडवीची उत्तरे सुरज पाटील यांना देऊ लागला. विजयने वाहन विक्रीत गडबड केली आहे असा संशय सुरज यांना आला. त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. त्यावेळी विजयला विक्रीसाठी दिलेले वाहन तीन जणांनी एकमेकांना विकले असल्याचे तपासात उघड झाले. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.