दिवाळीचे गोडधोड खाऊन कंटाळा आला की काही तरी तिखट, झणझणीत खाण्याची इच्छा होते. थंडीची चाहूल लागलेल्या वातावरणात खवय्ये सामिष आहाराला पसंती देताना दिसतात. हल्ली हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा टेकअवे सेंटर्समधून घरी पार्सल नेऊन सहकुटुंब खाण्याचा ट्रेंड रुजू लागला आहे. खाद्यसंस्कृतीतील या बदलत्या वाऱ्याची दखल घेत नीरज रायकर यांनी डोंबिवलीत असेच एक फक्त ‘टेकअवे सेंटर’ सुरू केले आहे. त्याचे नावच ‘द पार्सल’ आहे.  विविध मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ येथे पार्सल स्वरूपात उपलब्ध आहेत.

‘द पार्सल’ हे नावाप्रमाणेच केवळ पार्सल सेवा पुरवतं. पाच वर्षांपूर्वी रायकर आणि त्यांच्या मित्राच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यांनी हॉटेल न टाकता केवळ झटपट पार्सल सेवा सुरू केली. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी सूपपासून कॉम्बो ऑफपर्यंत इथे सर्व काही उपलब्ध आहे.

‘द पार्सल’मध्ये मुख्यत्वे करून पंजाबी, चायनीज आणि तंदूर पदार्थाची लज्जत तुम्हाला अनुभवता येईल. येथे मांसाहारी पदार्थाबरोबरच शाकाहारी पदार्थही उपलब्ध आहेत. मांसाहारी पदार्थामध्ये चिकन दही लसूणी, तंदुरी लॉलीपॉप, तर शाकाहारी पदार्थामध्ये पनिर बंजारा कबाब, पनिर पहाडी कबाब तंदुरी आलू हे पदार्थ डोंबिवलीकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.

येथे अस्सल बिर्याणीही मिळते. थोडय़ा वेगळ्या चवीच्या शोधात असाल तर येथील ‘चीज तुकडी’ खाऊन पाहायला हरकत नाही. बहुतेक चीजप्रेमी येथील हा पदार्थ नेताना दिसतात. यात ब्रेडमध्ये चीज स्टफिंग करून ते डीप फ्राय केले जाते. त्यामुळे खाताना वितळलेलं चीज आणि ब्रेड याची चव अतिशय चविष्ट लागते. याशिवाय येथे अतिशय वेगळे कबाब मिळतात. येथील चिकन-दही-लसुणी कबाब, चिकन पहाडी कबाब सर्वात लोकप्रिय आहे. मात्र त्याचबरोबर लज्जतदार गार्लिक आणि मसाल्यांमध्ये चिकन घालून तयार करण्यात आलेला चिकन गार्लिक रोस्ट या पदार्थाने बच्चे कंपनीला भुरळ घातली आहे.

येथे मिळणारा ‘पिकिंग राइस’ हा पदार्थ लाजबाब आहे. एखाद्या चॉकलेट केकचे जसे थर लावले जातात, तसे येथील चटकदार मसाल्यांमध्ये एकरूप झालेला राइस, त्यावर चमचमीत ग्रेवीचा थर भल्या मोठय़ा ऑमलेटमध्ये पॅक करून सव्‍‌र्ह केला जातो. हा ‘पॅक’ केलेला पदार्थ ‘पिक’ करून नेला जातो म्हणून त्याला पिकिंग राइस असे नाव देण्यात आल्याचे रायकर यांनी सांगितलं.

शाकाहारी खवय्यांसाठीही येथे काही विशेष पदार्थाची मेजवानी उपलब्ध आहे. विशेषत: व्हेज आफताबी हंडी व पनीर आफताबी हंडी हे पदार्थ खवय्यांच्या खास पसंतीचे आहेत. आफताबी हंडीमध्ये कमी तिखट पण तितकीच चविष्ट भाजी मिळते. तसेच पनीर लाझीझ, व्हेज मराठा आणि पुन्हा व्हेज खवय्यांना मालवणी चवीचा आस्वाद घेता यावा, यासाठी पनीर मालवणी या विशेष भाज्या येथे आहेत. येथे काही स्पेशल कॉम्बोही आहेत. जे तुम्हाला फक्त आणि फक्त इथेच मिळतील. तसेच मिक्स प्लाटर आणि कबाब याखेरीज इतर कुठेही मिळणार नाहीत, असे एकापेक्षा एक चविष्ट प्रकार इथे उपलब्ध आहेत.

पार्सल,

  • शॉप नं. ९, अंबिका पॅलेस, टंडन रोड, डोंबिवली (पू)
  • वेळ- सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते ११. मंगळवार बंद.)