खड्ड्यांमुळे गेल्या चार महिन्यांपासून हैराण झालेल्या डोंबिवलीतील जागरुक नागरिकांनी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, शासनाचे डोळे उघडण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून काही जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन“डोंबिवलीतील खड्डे जगात भारी’ नावाने टी शर्ट उत्पादित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘मर्यादित काम करणार असाल तर कामा एवढेच वेतन घ्या’; शहर अभियंत्यांकडून कनिष्ठ अभियंत्यांची कानउघडणी

शुभ्र धवल बंडीवर (बनियन) ‘डोंबिवलीतील खड्डे जगात भारी’ अशी नाममुद्रा बंडीच्या पुढील भागावर उमटविण्यात आली आहे. या नाममुद्रेच्या खाली एक इमोजी हातात भोंगा घेऊन डोंबिवलीतील रस्ते, खड्ड्यांचा डंका पिटत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या बंडीची छबी समाज माध्यमांवर तुफान प्रसारित होत आहे. कल्याण, डोंबिवली, पुणे आणि विदेशातील डोंबिवली, कल्याणमधील नागरिक या बंडीला आपली अनुकुलता दाखवित आहेत.

गेल्या तीन महिन्याच्या काळात कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांनी रस्ते, खड्डे यांचा त्रास सहन केला. आता पाऊस थांबल्याने खड्डे, रस्त्यांवर पालिकेच्या ठेकेदारांनी टाकलेली माती, सिमेंटचा गिलावा सुकला असल्याने तो वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे उडत असल्याने नागरिकांना श्वसन, खोकल्याचे त्रास सुरू झाले आहेत. या रस्त्यांच्या भागात असलेल्या सोसायट्यांमधील रहिवासी या धुळलोटीने हैराण आहेत.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील नागरिकांची दिवाळी गोड

गेल्या दोन वर्षापूर्वी कल्याण, डोंबिवलीतील खड्ड्यांवर विविध प्रकारच्या मिम्स तयार करण्यात आल्या. त्याची तुफान चर्चा झाली. आता मिम्सपेक्षा प्रत्यक्ष खडड्यांचा संदेश देणारी बंडी घालून रस्त्यावर उतरण्याचा निर्धार काही जागरुक डोंबिवलीतील नागरिकांनी केला आहे. या बंडीला मिळणारा प्रतिसाद पाहून डोंबिवलीतील प्रत्येक नागरिक, प्रवासी ही बंडी खरेदी करील, असा विश्वास समाज माध्यमांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

समाज माध्यमांमधून डोंबिवलीतील खड्डे सतत लक्ष्य केले जात असल्याने अस्वस्थ झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिवाळीच्या २६ तारखेपर्यंत रस्ते, बांधकामांशी संबंधित अभियंते, फेरीवाले, कचरा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी २४ तास कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात दुध बंदी; ‘या’मागण्यांसाठी दुध विक्रेत्यांचे शुक्रवारी दुध बंद आंदोलन

शहरात सध्या खड्ड्यांची मलमपट्टी करण्याची कामे ठराविक साचेबध्द ठेकेदार करत आहेत. नगरसेवकांचे समर्थक रस्ते ठेकेदार असल्याने त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण कामे होणार नाहीत, असे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी सांगितले. माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी पावसाळ्यापूर्वी मे अखेर पर्यंत करावयाची रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणीची कामे जुलै मध्ये सुरू केली. त्याचे दुष्परिणाम आता कल्याण डोंबिवलीतील प्रवासी भोगत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pits of dombivli are the best in the world name t shirts in the market thane news dpj