ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या खिशातील रोख रकमेसह मोबाईल चोरत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरात गस्त वाढविली आहे. याचदरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. इशाक सय्यद (४६)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा- डोंबिवली: मानपाडा रस्त्यावरील साईबाबा चौक ते बुधाजी चौक रस्ता वाहतूकीसाठी बंद, कारण….
पनवेल येथे राहणारे ३५ वर्षीय प्रवासी हे मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊवर उभे होते. लोकल आल्यानंतर ते त्यामध्ये बसण्यासाठी जात होते. डब्यात शिरत असतानाच गर्दीचा गैरफायदा घेत इशाक याने त्यांच्या पँटच्या खिशामधील १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. त्याचवेळी मोबाईल चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. यानंतर इशान हा तिथून पळून जाऊ लागला. दरम्यान, या फलाटावर गस्त घालत असलेल्या ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने इशाकला पाठलाग करून पकडले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इशाकला अटक केली आहे.