ठाणे: ठाण्यातील पाचपाखाडी भागात उभारण्यात आलेले प्रति तुळजापुर मंदीर हे सर्वांचेच असेल आणि या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. तुळजापुर मंदीरात ज्याप्रमाणे ३६५ दिवस पुजा अर्चा होते, त्याचप्रमाणे या मंदिरातही पुजा-अर्चा होईल. त्यामुळे हे मंदीर भविष्यात प्रति तुळजापुर मंदीर म्हणून उद्यास येईल आणि सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनेल, असेही ते म्हणाले.

काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आहे. थेट तमीळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड एडकाॅमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. अन् प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला.

लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे, असे आव्हाड म्हणाले. या मंदीरावर मंगळवार, २९ एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. ब्रह्मचारीच्या हस्ते कळसाची मंदीरावर स्थापना केली जाणार आहे. मात्र, या मागचे शास्त्र मला माहित नसून अशाप्रकारे कळसाची स्थापना होणार असल्याचे मला सांगण्यात आलेले आहे, असे आव्हाड म्हणाले. येत्या ३० एप्रिलला मंदीरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे म्हटले आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये

सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ खांब, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे. २६ खांब हे अंखड आहेत. मंदिरात प्रवेशद्वार, महामंडप आणि मदिराचे गर्भगृह अशी तीन टप्प्यात मंदीराची रचना करण्यात आलेली आहे. वैदीक शास्त्रामध्ये नवग्रहाला महत्व असून हे नवग्रही मंदिरात स्थापित करण्यात आलेले आहेत, असे वास्तुविशारद संजय बोबडे यांनी सांगितले.

अधिकृत मंदिराची उभारणीठाणे महापालिकेकडून मंदिरासाठी रितसर जागा मिळविली. मंदिराचे आराखडे पालिकेच्या शहर विकास विभागाकडे जमा केले आणि मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविल्या. बांधकाम पुर्णत्व प्रमाणपत्र आणि बांधकाम वापर प्रमाणपत्र अशी दोन्ही कागदपत्रे पालिकेकडून आम्हाला प्राप्त झाल्यामुळे हे मंदिर एक इंचही अनधिकृत नाही, हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. तसेच या मंदिराला पाचशे वर्षे काहीच होणार नाही, असे वास्तु विशारदांचे म्हणणे आहे, असे आव्हाड म्हणाले.