ठाणे : ठाण्यातील खोपट भागात असलेल्या ब्रम्हाळा तलावाच्या आवारात गेल्याकाही दिवसांपासून गर्दुल्ल्यांचा वावर वाढू लागला आहे. हे गर्दुल्ले सुरक्षा भिंती ओलांडून थेट ब्रम्हाळा तलावाच्या बागेत प्रवेश करत आहेत. सुरक्षा रक्षक आणि जेष्ठ नागरिक या गर्दुल्ल्यांना हटकत असतात. परंतु त्यांनाही जुमानत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी केवळ एकच सुरक्षा रक्षक असून सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी येथील जेष्ठ नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा… ठाणे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात कुठेही तडजोड नको ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
खोपट येथे ब्रम्हाळा तलाव असून या परिसरात ठाणे महापालिकेने सुशोभिकरण केले आहे. त्यामुळे तलावाच्या आवारात मंदिर, चालण्यासाठी जागा तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी जेष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर, येथील ब्रम्हाळा जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने विविध संगीत कार्यक्रम, मुलाखतींच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. त्यामुळे तलावाच्या आवारात असलेल्या बागेत मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. गेल्याकाही दिवसांपासून काही गर्दुल्ल्यांचा वावर या परिसरात वाढला आहे. गर्दुल्ले, शाळकरी मुले बेकायदेशीरपणे बागेचे कुंपन आणि संरक्षण भिंती ओलांडून प्रवेश करत आहेत. नागरिकांसमोर धुम्रपान आणि अमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. या गर्दुल्ल्यांना येथील सुरक्षा रक्षक आणि काही जेष्ठ नागरिकांकडून वारंवार हटकण्यात येते. परंतु त्यांनाही हे गर्दुल्ले सुरक्षा रक्षक आणि जेष्ठ नागरिकांनाही जुमानत नाहीत. अनेकदा पोलिसांना संपर्क साधला जातो. परंतु तोपर्यंत गर्दुल्ले संरक्षण भिंत ओलांडून पळून जात असतात. असे येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा… डोंबिवलीतील तरुणाला इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात, दुचाकी घेऊन कल्याणचा मित्र फरार
ब्रम्हाळा तलावालगत एक स्वच्छतागृह ही बांधण्यात आले आहे. परंतु ते स्वच्छतागृह ही तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच तलावही अनेकदा अस्वच्छ असते. यासंदर्भात ब्रम्हाळा जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने यासंदर्भाच्या तक्रारी ठाणे महापालिकेकडे दिल्या आहेत. पंरतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे संस्थेकडून सांगितले जात आहे.
हेही वाचा… नियमित, बेकायदा इमारतींची माहिती दाखल करा; पोलिसांच्या तपास पथकाचे कल्याण-डोंबिवली पालिकेला आदेश
तलावाच्या आवारात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. परंतु इतक्या मोठ्या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आहे. येथे काही ठिकाणी संरक्षण भिंतीही तोडण्यात आल्या आहेत. तेथून हे गर्दुल्ले शिरत असतात. प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. – नाना मारणे, अध्यक्ष, ब्रम्हाळा जेष्ठ नागरिक संस्था, ठाणे.