ठाणे : येथील पाचपखाडी भागात तीन वर्षांपुर्वी तयार केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता खचल्याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन या कामाचा दर्जा तपासण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार रस्त्याचा एक छोटा तुकडा काढून त्याची तपासणी मुंबई आयआयटी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. या अहवालानंतरच रस्ता खचण्यामागे निकृष्ट दर्जाचे काम की इतर दुसरे कोणते कारण आहे, हे स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील पाचपखाडी भागात संत ज्ञानेश्वर पथ हा रस्ता आहे. ठाणे महापालिका मुख्यालयापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर हा रस्ता आहे. तीन वर्षांपुर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले. याठिकाणी यु.टी.डब्ल्यु.टी. पध्दतीने रस्ता तयार करण्यात आला. याठिकाणी बुधवारी सकाळी एक ट्रक बांधकाम साहित्य घेऊन आला होता. त्यातून बांधकाम साहित्य उतरवत असताना अचानक ट्रकच्या मागच्या चाकाखालील रस्ता खाली खचला गेला. या घटनेची माहिती भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी दिल्यानंतर पालिकेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ठाणे शहरातील रस्ते कामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचच रस्ता खचल्याने पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच आयआयटी तज्ज्ञांमार्फत या रस्त्याचा कामाचा दर्जा तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आयुक्त बांगर यांच्या आदेशानुसार आयआयटीच्या तज्ज्ञांच्या उपस्थित रस्त्याचा एक तुकडा (कोअर कटींग) काढून घेतला जाणार आहे. हा तुकडा आयआयटीच्या प्रयोगशाळेत तपासला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाविषयी माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा >>>Mira Road Murder : “मनोज साने माझा मामा आणि तो खूप…”, सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

तर ठेकेदारवर कारवाई

आयआयटी तपासणी अहवालामध्ये या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत त्रुटी आढळल्या तर संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा रस्त्याचा दोष दायित्व कालावधी असल्याने संबंधित ठेकेदारामार्फत हा रस्ता पूर्ववत करण्याचे काम त्वरीत करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The quality of work on the tarred road in thane will be inspected by thane municipal commissioner abhijit bangar amy