ठाणे – मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला. वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता. दुपारी अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीत वाढ झाली.
ठाणे शहरात मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजित करण्यात आले होते. या सभेपूर्वी जरांगे यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली. खारेगाव टोलनाका, माजिवडा उड्डाणपूल, नितीन कंपनी मार्गे पाचपाखाडी येथून राम मारुती रोड, तलावपाली मार्गे गडकरी रंगायतन अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल लागू केले होते. तरीही या कालावधीत रॅलीच्या कालावधीत शहरात कोंडी झाली.
हेही वाचा – ठाण्यात टीएमटी प्रवाशांचे हाल, वाहकांच्या कमतरतेमुळे बसगाड्यांचा तुटवडा
माजिवडा ते कापूरबावडी, साकेत पूल, गोकुळ नगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यांनतर पूर्व द्रुतगती महामार्ग येथील नितीन कंपनी भागातून दुचाकी रॅली नितीन कंपनी, पाचपाखाडी येथे आली. त्यामुळे नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर, महापालिका मुख्यालय परिसरात कोंडी झाली. तसेच घोडबंदर मार्गावरही कोंडी झाली. ठाणे शहरात टेंभी नाका, राम मारुती रोड, गडकरी रंगायतन परिसरात रस्ते बंद करण्यात आले होते. या बदलामुळे नागरिकांचे हाल झाले. बाजारपेठ परिसरातही कोंडी झाली. अरुंद रस्ते आणि वाहतूक बदलामुळे कोंडीत भर पडली.